ब्रेनस्ट्रोकमुळे बोलताही येत नव्हतं हातात काम देखील नव्हतं… सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील अभिनेत्याची कहाणी
सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेता राहुल मेहेंदळे एकेकाळी ब्रेन स्ट्रोकमुळे मोठ्या संकटात सापडला होता. यामुळे काही शब्दांचा त्याला उच्चारच जमत नव्हता. राहुल मेहेंदळेच्या या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. राहुलची आई सुजाता मेहेंदळे या रेल्वेच्या पतपेढीत नोकरी करायच्या वडील चंद्रकांत मेहेंदळे हे देखील नोकरी करत असत पण आवड म्हणून ते नाटकातूनही काम करत . पार्ल्यात बालपण गेल्याने राहुलच्या घराजवळ अनेक कलाकार मंडळी राहत होती. त्यांचा प्रभाव बालमनावर होत होता त्यामुळे अभिनय क्षेत्रात जावं असा लहानपणीच डोक्यात विचार होता. वडील हौशी नाटकातून काम करत तेव्हा त्यांच्याबरोबर कित्येकदा नाटक बघणे झाले. शाळेत असताना त्याने कधी नाटकात काम केले नव्हते पण कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवला. पण अभिनय क्षेत्र बेभरवशाचे त्यामुळे बीकॉम करून त्याच क्षेत्रात काहीतरी करावं अशी त्याची इच्छा होती.
पण बाबांच्या इच्छेखातर ‘प्रिय आईस’ हे चंद्रकांत कुलकर्णी यांचं नाटक त्याने करून बघितलं. हे राहुलचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं. त्यानंतर मात्र बोक्या सातबंडे, बोलाची कधी बोलाचा भात, ऊन पाऊस, अवंतिका, सुहासीन, बेधुंद मनाच्या लहरी अशा अनेक मालिकांमधून राहुल ने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. एका जाहिरातीसाठी विनय आपटे यांच्याकडे काम करत असताना काही मॉडेल्स हव्या होत्या. तेव्हा श्वेताला या ऍडफिल्म बद्दल विचारलं तेव्हा श्वेताने हो म्हटलं. पुढे एकमेकांसोबत काम करत असताना तिला राहुल आवडू लागला. बोक्या सातबंडे मधील राहुलचं काम तिला आवडत होतं. एकमेकांना दोघेही आवडत असताना राहुलने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. २००३ साली घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न झाले. दोघांचा संसार सुखाचा सुरू असतानाच एक दिवस राहुल सकाळी श्लोक म्हणत असताना ‘ळ’ आणि ‘ह’ हे दोन शब्द त्याला बोलताच येत नव्हते. अचानक असं का झालं म्हणून राहुल खूप घाबरून गेला.एक दिवस पूर्ण तसाच गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल डॉक्टरांकडे गेला. तेव्हा त्याला ब्रेन स्ट्रोक झाला असल्याचे सांगण्यात आले. एक तिळापेक्षा बारीकसा स्पॉट रक्त प्रवाहात येतो तो टॉनिक्स आणि ब्रेन टॉनिक्समुळे विरघळून जातो. पण ही गोष्ट त्यालाच खूप उशिरा समजली. त्यामुळे राहुलला काही शब्द उच्चारणे कठीण जात होते.
मग आयुर्वेदिक उपचार सुरू केले पण त्यात बराचसा वेळ गेला. आपण कलाकार आहोत आणि आपल्याला बोलता आलं पाहिजे या विचाराने राहुलने लगेचच डिस्चार्ज मिळवला आणि त्यावर थेरपी करण्यासाठी नानावटी रुग्णालय गाठले. त्यादरम्यान राहुल ची सौ कां रंगभूमी या नाटकातून काम करत होता. नाटकातील शब्द खूप कठीण होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहुल पार्ल्यातील दीनानाथ थिएटरमध्ये गेला, रंगभूमीच्या पाया पडला. त्याच्या या अवस्थेमुळे नाटक काही दिवस थांबलं होतं. ८ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली त्यानंतर १२ ऑक्टोबरला डिस्चार्ज मिळाला. काहीही करून १ नोव्हेंबरला नाटकाचा प्रयोग करायचा असा निश्चय केल्यानंतर राहुल शब्द उच्चारू लागला. शब्द म्हणताच येत नव्हते तरीही हार ना मानता त्याचे प्रयत्न सुरू होते. १ नोव्हेंबरला प्रयोग झाला त्यावेळी राहुलची शब्दांवर ९० टक्के पकड बसली होती. १० टक्के प्रॉब्लेम होता पण तो इतरांना कोणालाही जाणवत नव्हता. त्यानंतर हळूहळू शब्दांवर जम बसत गेला आणि राहुल पुन्हा पूर्वपदावर आला. सध्या तो सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. श्वेताने देखील या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली आहे. या कठीण काळातून आपल्याला बाहेर पाडायचं हा राहुलचा विश्वास होता, या कठीण काळात श्वेताचीही त्याला खूप मोठी साथ मिळाली हे विशेष.