प्राजक्ता माळी सध्या तिचा क्वालिटी टाइम तिच्या कर्जत येथील फार्महाऊसमध्ये घालवताना दिसत आहे. नुकताच प्राजक्ताची प्रमुख भूमिका असलेला ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आणि शुटिंगनंतर ती आता तिचा वेळ या फार्महाऊस साठी देणार आहे असे तिने काल म्हटले होते. फार्महाऊसमधले प्राजक्ताचे निवांत क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. त्यामुळे प्राजक्ता तिच्या फार्महाऊसमध्ये रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळत आहे. प्राजक्ताचं निसर्गाच्या कुशीत असलेलं हे फार्महाऊस सगळ्यांनाच मोहित करत आहे. अनेकांनी तिच्या या फार्महाऊसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्थात प्राजक्ताने तीचं हे फार्महाऊस पर्यटकांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी खुले केलेले आहे त्याचमुळे लोकांना तिच्या या फार्महाऊसला भेट देण्याची इच्छा आहे.
पण हो प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये तुम्हाला राहायला जायचंच असेल तर त्यासाठी तुम्हाला बक्कळ पैसा खर्च करावा लागणार आहे. कारण तिच्या या ३ बीएचके व्हीलाचे एका रात्रीचे भाडे तुमच्या खिशाला नक्कीच कात्री लावणारे आहेत. कर्जत तालुक्यातील गौळवाडी या गावात प्राजक्ताने हे फार्महाऊस खरेदी केलं आहे. ३ बेडरूम्स, हॉल, किचन , सिमिंगपूल असे तिचे ऐसपैस फार्महाऊस पर्यटकांसाठी भाडेतत्वावर देण्यात येत आहे. Stay Leisurely यांच्याकडे प्राजक्ताने तिचं हे फार्महाऊस हँडओव्हर केलं आहे. त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईटवर या फार्महाऊसची सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. द ग्रीन मोन्टाना या फार्महाऊसमध्ये एकाचवेळी १५ पेक्षा जास्त व्यक्ती राहू शकतात त्यामुळे तुम्हाला जर ग्रुपने या ठिकाणी राहायला जायचे असेल तर ते सहज शक्य आहे. दोन व्यक्तींना एक रात्र राहण्यासाठी इथे २०,२५० रुपये मोजावे लागणार आहेत. सोबतच ६००० रुपये टॅक्स आणि इतर खर्च वर मोजावे लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला वेळप्रसंगी वेगवेगळ्या ऑफर देण्यात येतील. पण हो जेवणाचा खर्च तुम्हाला वेगळा करावा लागणार आहे. जवळच्या हॉटेलमधुन तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ मागवू शकता. त्यासाठी काही नियम आणि अटी घालून देण्यात आले आहेत.
किचनमध्ये ओव्हन, गॅस अशा सुविधा दिलेल्या आहेत मात्र इथे तुम्ही जेवण बनवू शकत नाही. केवळ मागवलेले जेवण तुम्हाला गरम करायचे असेल तर या सुविधांचा वापर तुम्हाला करता येणार आहे. आणि जर त्यांच्याकडूनच तुम्हाला जेवण मागवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी अंदाजे ६०० रुपये तुम्हाला जेवणाचा खर्च द्यावा लागणार आहे. यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण असे शेड्युल असणार आहे. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी वेगवेगळे दर इथे आकारण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे या फार्महाऊसमध्ये पाळीव प्राणी आणण्यास बंदी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे पेट्स इथे आणता येणार नाहीत अशी अट घालण्यात आली आहे. तेव्हा प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये राहण्यासाठी तुम्हाला रग्गड पैसा खर्च करायचा असेल तर इथे तुम्ही नक्की भेट द्या आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा आस्वाद घ्या.