दबंग वाहिन्या ती अत्यंत भोळी निरागस निष्पाप…. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्य काही लाखात मग ती आयकर भरते का
गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमांवर होत असलेली बंदी यात बरेच गूढ दडलेले आहे असे म्हटले जाते. गौतमीची लोकप्रियता वाढवण्यासाठी तर अशा युक्त्या आखल्या जात नाहीत ना? असा प्रश्न आता तिच्याबाबतीत विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरकरांनी गौतमी पाटीलचे कार्यक्रम होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. या अशा कार्यक्रमामुळे तरुण पिढी वाया जात चालली आहे असे म्हणत गावकरी तिच्या कार्यक्रमांवर बंदीची मागणी करत आहेत. तर काल गौतमी पाटील हिचा अहमदनगर जिल्ह्यात कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तरीही गौतमी पाटीलने तिथे कार्यक्रम केला म्हणून तोफखाना पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याला अडथळा येत असल्याने प्रशासनानेच या कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती.
मात्र हे आदेश डावलून आयोजकांनी कार्यक्रम सादर केला तेव्हा आयोजक आणि गौतमी पाटील विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यागोदरच गौतमीने शाळेच्या प्रांगणातच कार्यक्रम केल्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती. गौतमी आणि तिचे कार्यक्रमात होणारे वाद हे समीकरण काही वेगळं नाही. उलट अशा गोष्टी मुद्दामहून केल्या जातात त्याचमुळे तिची लोकप्रियता वाढत जाते असे आता तिच्याबाबतीत बोलले जात आहे. यामुळे तिच्या शोवर बंदी येण्याऐवजी उलट तिचे कार्यक्रम जोरदार हिट होत चालले आहेत. हे पाहून मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांनी सात प्रश्न उपस्थित केले आहेत. राजन पाटील म्हणतात की, नमस्कार मंडळी, या काही प्रश्नांची उत्तरे शोधा. 1. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होऊन पोलिसांचा लाठीमार का होतो ? यापूर्वी रसिकांना अनेक लावणी सम्राज्ञीनी वेड लावले होते. पण असा प्रकार क्वचितच झाला असेल. मग आत्ताच का ? 2. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्य काही लाखात असते ? 3. जर हे सत्य असेल तर ती या सर्व उत्पन्नावर आयकर भरते का ?
तिच्या उत्पन्नात कोणी सक्षम/सशक्त असामी वाटेकरी आहे का ? 5. जर असेल तर तो अदृश्य असामी कुठल्या विशिष्ठ पक्षाचा आहे का ? की ‘ तेलगी ‘ प्रकरणात होते म्हणे तसे सर्वपक्षीय सामील आहेत ? 6. काही दबंग वाहिन्या ती अत्यंत भोळी आहे, निरागस आहे, निष्पाप असून तिची हकनाक बदनामी केली जातेय अशी इमेज तयार करतायत का ? 7. ‘गौतमीच्या कार्यक्रमात राडा ‘ यात काही काहीतरी गूढ आहे असं तुम्हाला वाटतं का ? राजन पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर त्यांच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एकतर यामुळे तिची प्रसिद्धी वाढतच चालली आहे यामध्ये दुमत नाही असेच तिच्याबाबतीत म्हटले जात आहे.