आमच्या पप्पाने गंपती आणला फेम साईराज आणि छोट्या मायराचं नवं गाणं पाहिलंय …अवघ्या ४ वर्षांचा साईराज होतोय पुन्हा व्हायरल
सोशल मीडियावर एक रील बनवून रातोरात स्टार झालेला साईराज तुम्हाला आता चांगलाच स्मरणात राहिला असेल. या अवघ्या चार वर्षाच्या चिमुरड्याने ‘आमच्या पप्पाने गंपती आणला’ या गाण्यावर जे रील बनवले त्याला अबालवृद्धांनी अक्षरश डोक्यावर नाचवले. या रीलमुळे अवघ्या काही दिवसातच सगळीकडे साईराजच्याच नावाची चर्चा रंगली. अनेकांना साईराज प्रमाणे रील बनवण्याचा छंद जडला. साईराज हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कण्हेरवाडी या गावचा. स्वतः धनंजय मुंडे यांनी साईराजची भेट घेऊन त्याचे कौतुकही केले. आता याच चिमुरड्याला चक्क मराठी सृष्टीत झलकण्याची संधी मिळाली आहे. साईराजच्या कलागुणांना हेरून त्याची एका गाण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
प्रवीण कोळी यांनी आजवर अनेक गीतं प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहेत. त्यातील बहुतेक सगळीच गीतं चांगली लोकप्रिय देखील झालेली आहेत.गोव्याच्या किनाऱ्यावर, माझा बाप्पा किती गोड दिसतो, आईविना मला करमत नाही या गाण्यांच्या लोकप्रियतेनंतर प्रवीण कोळी आता ‘देवबाप्पा’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या गाण्यात चिमुकल्या साईराजला झलकण्याची संधी मिळत आहे. आज १६ सप्टेंबर रोजी हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. बालकलाकार मायरा वायकुळ, भरत जाधव, अंकीता राऊत हे देखिल या गाण्यात महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. साईराजची लोकप्रियता पाहूनच प्रवीण कोळी यांनी त्याला आपल्या नव्या गाण्यासाठी कास्ट केले आहे. साईराजने त्याच्या कण्हेरवाडी गावाचे नाव लौकिक केलं आहे. आमच्या पप्पाने गंपती आणला या गाण्यात साइराजचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप भावला होता. लोक सतत त्याचा व्हिडीओ पाहत होते. टुकुमुकू बघतोय चांगला या ओळीवर तर त्याने कमाल एक्सप्रेशन्स दिले होते. साईराज अवघ्या ४ वर्षांचा आहे पण या वयात त्याचे पाठांतर सुद्धा उत्तम आहे. हनुमान चालीसा आणि शाळेतील भाषण तो न चुकता पूर्ण म्हणतो यातच त्याचे खरे कौशल्य दिसून येते. आता त्याला गाण्यात झळकण्याची संधीच मिळाल्याने त्याच्या या सुप्त गुणांना मोठा वाव मिळणार आहे. साईराजला या पहिल्या वहिल्या गाण्यासाठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.