एक सोयीस्कर मार्ग म्हणून लोक ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडतात. अगदी समन्यातला सामान्य माणूसही आता दुकानात जाऊन वस्तू खरेदी करत बसण्यापेक्षा घरबसल्या मोबाईल फोनवरून ऑर्डर करतात. अर्थात या गोष्टींमुळे वेळेची बचतही होते आणि कमीतकमी किंमतीत वस्तू मिळाल्याचे तुम्हाला समाधानही मिळते. पण कित्येकदा ऑनलाइन खरेदी केल्यामुळे कधीकधी तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान देखील सोसावे लागते . असाच काहीसा अनुभव अभिनेते निखिल रत्नपारखी यांनी घेतला आहे. निखिल आणि भक्ती रत्नपारखी हे दाम्पत्य गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. सध्या हे दाम्पत्य मुंबईहून पुण्याला स्थायिक झालेलं आहे. निखिल रत्नपारखी यांनी आज सोशल मीडियावर एक फसवणूक झाल्याची माहिती शेअर केली होती.
“Amazon आता चोरांचा अड्डा झाला आहे. शक्यतो तिथून कुठलीही प्राॅडक्टस् घेऊ नका. ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा.” असे म्हणत त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. बातमी अर्धवट असल्याने नेमके काय घडले याबाबत त्यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला. पण त्यानंतर एक सविस्तर पोस्ट त्यांनी शेअर केलेली पाहायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “मी ॲमेझॉनवरून एक पेन ड्राईव्ह ऑर्डर केला होता. तो डॅमेज होता म्हणून मी त्वरित रिप्लेसमेंट ऑर्डर दिली. तो घेऊन जायला कोणीही आलं नाही. म्हणून त्याविषयी मी चौकशी केली तर टाईम लिमिट उलटून गेली असं ते सांगतात. वास्तविक ऑर्डर देऊन सहा दिवस सुद्धा झाले नाहीत. आम्ही काही करू शकत नाही. यापुढे ते काही बोलतच नाहीयेत. आणि आता फायनली ते रिप्लेसमेंट देत नाहीयेत (पेन ड्राईव्ह महाग आहे) असे हे ॲमेझॉनवाले चोर आणि फसवणारे लोक आहेत.
विकत घेतलेल्या प्राॅडक्टची काहीही गॅरंटी नाही. निव्वळ फालतूपणा आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे. जीवाला थोडे कष्ट पडतील पण ॲमेझॉनवरून खरेदी बंद.” निखिल रत्नपारखी यांना आलेला हा फसवणुक झाल्याचा अनुभव पाहून अनेकांनी त्यांच्याही फसवणुकीच्या घटना कमेंट बॉक्समध्ये शेअर केल्या आहेत. सहजसोपे काम व्हावे म्हणून हे ऑनलाइन खरेदीचे प्रकार आता धोक्याचे ठरू लागले आहेत असेच चित्र त्यांच्या अनुभवावरून दिसत आहे. त्यामुळे कुठलीही ऑनलाइन खरेदी करताना अगोदर विचार केला जावा असे मत व्यक्त करण्यात येत आहे.