दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रभर दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मुंबई पुण्यातील मोठमोठ्या दहीहंडीला मराठी सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. जुई गडकरी, पल्लवी पाटील, कश्मिरा कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, महेश कोठारे तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकार ठिकठिकाणी दही हंडीच्या उत्सवाला हजर राहून गोविंदाना प्रोत्साहन देत होते. सन मराठी वाहिनीने त्यांच्या मालिकेतील कलाकारांसाठी खास दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी सुयश टिळकने ही हंडी फोडण्याचा मान पटकावला. तर धनश्री काडगावकर तसेच कुंजीका काळवींट यांनी शेवटच्या थरावर जाऊन हंडी फोडली. एकीकडे दही हंडीचा उत्सव साजरा करत असताना सिद्धार्थ जाधवच्या लेकीलाही हंडी फोडण्याचा मोह आवरेनासा झाला होता. सिद्धार्थ जाधवची लेक इरा हंडी फोडण्यासाठी वर चढली मात्र ही हंडी फोडताना तिची पूर्ण दमछाक झाली.
सिध्दार्थने इराचा हंडी फोडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. स्थानिक परिसरात लहाणग्यांसाठी एका छोट्याशा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. इरासोबत आणखी एका चिमुरड्याला स्थानिक लोकांनी वर उचलून धरले होते. इराच्या हातात हंडी फोडण्यासाठी नारळ देण्यात आला. खूप प्रयत्न करूनही इराच्या हातून दहीहंडी फुटत नव्हती. अखेर हंडी फोडताना नारळाला तडा गेला आणि त्यातून पाणी बाहेर पडू लागले. समोरचे हे दृश्य पाहून सिध्दार्थला मात्र त्याचे हसू आवरेनासे झाले होते. “दहीहंडी” नारळाने फोडतात…पण आमचा “गोविंदा” दहीहंडीने नारळ फोडतोय …असे मजेशीर कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलेले पाहायला मिळाले. सिध्दार्थने शेअर केलेल्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कुंभार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे अशा मजेशीर प्रतिक्रियांनी कमेंटबॉक्स भरला आहे. गेल्या वर्षी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गुजरातमधील दोन व्यक्ती दहीहंडी फोडण्यासाठी अथक प्रयत्न करत होते मात्र त्यांना काही केल्या ती हंडी फुटत नव्हती. हंडी बनवणाऱ्या कुंभराचा शोध घेतला पाहिजे अशी मजेशीर प्रतिक्रिया त्यावेळी व्हायरल झाली होती.