
आज ९ मे रोजी बिग बॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर आणि साधना काकतकर यांच्या लग्नाचा बार उडला. अक्षय केळकर आणि साधनाच्या लग्नाची लगबग गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज पार पडलेल्या लग्नसोहळ्यात बरेचसे मराठी सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसले. अभिनेत्री समृद्धी केळकर तर अक्षयच्या लग्नासाठी खास तयारीत होती. काल हळदीच्या वेळी प्रथमेश परब आणि समृद्धी केळकर यांनी आवर्जून हजेरी लावली. तर आज लग्नसोहळ्यात बिग बॉसच्या ४ थ्या सिजनचे स्पर्धक देखील हजर होते. यावेळी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने अक्षय आणि साधनाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

अक्षय केळकर आणि साधना काकतकर गेली १० वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. बिग बॉसच्या घरात अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. ‘रमा’ असे तिचे नाव असल्याचे त्यावेळी त्याने मीडियाला सांगितले होते. तेव्हा ही रमा म्हणजेच समृद्धी केळकर तर नाही ना? असे प्रश्न प्रेक्षकांना पडू लागले. पण काहीच महिन्यांपूर्वी अक्षयने रमाला त्याच्या चाहत्यांसमोर आणले तेव्हा ही रमा म्हणजेच गायिका साधना काकतकर आहे हे स्पष्ट झाले. साधना ही अक्षयच्या बहिणीची खास मैत्रीण आहे. दरम्यान बिग बॉसचा विजेता बनल्यानंतर अक्षयला म्हाडाची लॉटरी देखील लागली. विठ्ठलाचा भक्त असलेल्या अक्षयच्या घरात विठ्ठलाची मूर्ती बसवण्यात आली.

इंटेरिअरमध्ये त्याने खास वारकऱ्यांची थीम देखील अरेंज केली. नवीन हक्काच्या घरात सेटल झाल्यानंतर त्याने लग्नाचा विचार केला. आज ९ मे रोजी दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नाला त्यांनी गुलाबी रंगाची थीम निवडली होती. नववधू साधना काकतकर या गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुरेख दिसत होती. तर अक्षयनेही ऑफ व्हाइट आणि पिंक कलरचा शेरवानी परिधान केला होता. दुपारी लग्नसोहळा पार पडल्यानंतर रिसेप्शन सोहळा संपन्न झाला. तूर्तास अक्षय केळकर आणि साधना काकतकर यांना आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!.