सोशल मीडियावर नेहमीच चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा होत असते. सेलिब्रिटी म्हटलं की याच सोशल मीडियावर तुम्हाला टीकाकारांना सामोरं जावं लागतं. कोणी कपड्यांवरून ट्रोल होतो तर कोणी विरोधी भूमिका साकारल्याने ट्रोल होतो. पण इथे वायकुळ कुटुंब एक वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होत आहे. मायरा वायकुळ ही बालकलाकार तुमच्या चांगलीच परिचयाची आहे. खरं तर ती लहान होती तेव्हाच तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते तयार झाले होते. याच प्रसिद्धीमुळे मायराला अभिनय क्षेत्रात येण्याचा मार्ग सापडला होता. काही दिवसांपूर्वी मायराला भाऊ झाला. या चिमुरड्याची झलक वायकुळ कुटुंबाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केली आहे.
ते पाहून मायराचा भाऊ दिसायला तिच्यासारखाच असल्याने त्याचे कौतुक केले जात आहे. मात्र इथे एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकलेली आहे. मायराचा भाऊ जन्माला येऊन अवघे काही महिन्यांचाच झाला आहे. पण वायकुळ कुटुंबाने ‘babyvaykul’ या नावाने त्याचे इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले आहे. त्यामुळे मायराचे आईवडील सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. आता या मुलांकडून वायकुळ कुटुंब पैसे कमावणार, लोभी कुटुंब असे म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. खरं तर सोशल मीडिया हे अनेकांचं कमाईचं नवं माध्यम बनलं आहे. गरीबतल्या गरीबलाही या सोशल मीडियाची भुरळ पडली आहे. त्यामुळे अनेकांना केवळ रीलच्या माध्यमातून कमाईचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
यात वायकुळ कुटुंबही मागे नाही. कारण मायरा लहान असल्यापासूनच तिचे युट्युब आणि इन्स्टाग्रामवर लाखो चाहते तयार झाले होते. देशभरात असे कितीतरी पालक आहेत जे आपल्या मुलांना सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आहेत. ज्यांना त्याचा मार्ग गवसला तो यात यशस्वी झाला. त्यामुळे केवळ एकाकडे पाहून ट्रोल करणे चुकीचे आहे असेही मत व्यक्त करण्यात येत आहे. तो त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग आहे तुम्हीही त्या मार्गाने पैसे कमावू शकता. त्यामुळे टीका करत बसण्यापेक्षा ते नसेल आवडत तर दुर्लक्ष करणे आणि पुढे निघून जाणे हेच शहाणपणाचे ठरेल.