
कलर्स मराठीवरील इंद्रायणी ही मालिका आता लिप घेणार आहे. त्यामुळे लाडक्या इंद्रायणीला आता मोठं झालेलं पाहायला मिळणार आहे. इंद्रायणी मालिकेत बालकलाकार सांची भोयार हिने प्रमुख भूमिका साकारली होती. अनेक संकटांचा सामना करत ही चिमुरडी कीर्तनकार बनून लोकांच्या मनाचा ठाव घेताना दिसली. मित्रांसोबतच्या तिच्या गमतीजमती बघायला प्रेक्षकांना मजेशीर वाटत होते पण आता हीच इंद्रायणी मोठी होणार आहे. नुकताच सांची भोयार हिने या मालिकेला निरोप दिला आहे. आणि आता मोठेपणीची इंद्रायणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

येत्या १० मार्चपासून इंद्रायणीचा हा नवीन प्रवास सुरु होत आहे. त्यामुळे ही भूमिका आता अभिनेत्री कांची शिंदे साकारताना दिसणार आहे. नुकतेच अभिनेत्री कांची शिंदे हिने मालिकेच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. इंद्रायणीच्या भूमिकेत तिला पाहून अनेकांनी तिचं स्वागत केलं आहे. कांची शिंदे ही अभिनेत्री तर आहेच पण लावणी नृत्याची ती विशेष निपुण असलेली पाहायला मिळते. कांची हिने स्वतःची नृत्याची अकॅडमी सुरू केली आहे. त्यात ती अनेकांना लावणी नृत्याचे धडे देताना दिसते.
पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत कांची शिंदे हिने महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय आदिशक्ती मालिकेतही ती झळकली होती. आता इंद्रायणी मालिकेतून कांची शिंदे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी कांची खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांकडून आपल्या या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा तिने व्यक्त केली आहे.