स्टार प्रवाहची ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप…निवेदिता सराफ यांची दमदार भूमिका पाहण्यास प्रेक्षक उत्सुक
स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही दिवसांत नवीन मालिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या मालिकांना डच्चू दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण त्यावेळी मालिकेची प्रसारणाची वेळ जाहीर करण्यात आली नव्हती. पण आता येत्या २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रसारित होईल असे जाहीर करण्यात आले आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला ही अभिनयाची संधी मिळणार आहे.
याशिवाय आणखी कोणकोणते कलाकार मालिकेत झळकणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान मालिकेची प्रसारणाची वेळ जाहीर केल्यानंतर स्टार प्रवाह वाहिनी गेली ५ वर्षे चाललेल्या मालिकेला डच्चू देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण दुपारी २.३० वाजता आई कुठे काय करते ही मालिका प्रसारित केली जात आहे. २०१९ पासून ही मालिका आजतागायत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत बऱ्याचशा घडामोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पण अजूनही या मालिकेत बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होणे अपेक्षित आहे.
त्यामुळे ही मालिका संपवण्यावर भर दिला जाईल की प्रसारणाच्या वेळेत बदल होईल हे लवकरच स्पष्ट होईल. पण आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमुळे आई कुठे काय करते मालिका संपवली जात असेल तर प्रेक्षकही निश्चितच या निर्णयाचे स्वागत करतील. यावर वाहिनीचा निर्णय काय असणार आहे हे लवकरच जाहीर होईल तूर्तास, निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांना या नवीन मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा.