एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा….मराठी अभिनेत्रींच्या वक्तव्यावरून होतेय प्रचंड ट्रोल
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आज दुपारी मुख्यमंत्री यावर कोणता निर्णय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ठिक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात आले आहे. यात अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. तर रितेश देशमुखने देखील एक ट्विट करत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समर्थन दाखवले. तर किरण माने यांनीही या उपोषणाला पाठिंबा दर्शवला मात्र अभिनेत्री केतकी चितळे हिने मात्र एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला. केतकीने सोशल मीडियावर एक एसटी फोडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यात तिने म्हटले आहे की, “एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??! इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला UniformCivilLaw, तसेच UniformCriminalLaw ची गरज आहे.।।जय हिंद।। …।।वंदेमातरम्।। …भारत माता की जय” असे म्हणत केतकीने तिची नाराजी सोशल मीडियावर जाहीर केली. पण यामुळे केतकी प्रचंड प्रमाणावर ट्रोल झाली आहे. केतकीच्या या विचारांचा सगळ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या मुद्द्यावर तिने न बोललेलंच बरं असे म्हणत अनेकांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. अर्थात एसटी वर दगड टाकणारा व्यक्ती हा नशेत असल्याचे दिसून येते. असे एसटीवर दगड फेकल्यामुळे कोणालातरी दुखापत होऊ शकते असे तिने एका युजरला उत्तर देताना म्हटले आहे.” Amit Khadangle सामान्य जनतेची एस टी फोडून कुणाचे नुकसान होते याचा विचार करा जरा. तोड फोड करायची असेल तर ज्यांच्या “हक्का” साठी लढताय, त्यांचेच नुकसान का करताय? तो दगड काच फोडून चालकाला लागला असता तर?” असे तिचे म्हणणे आहे. पण असे केल्याने तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का बुवा? हा तिचा प्रश्न चीड आणणारा ठरला आहे. जिथे सरळ मार्गाने मागितले तर काहीही मिळत नाही त्याला असे पर्याय वापरले जातात तरच सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार होते असा मुद्दा अनेकांनी उठवला आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती आता अधिकच खालावली असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र शासनाला त्यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती मात्र ही मुदत देऊनही जरांगे पाटील यांनी अजून थोडी वाट पाहणार असल्याचे म्हटले होते. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा लढा चालू राहील असे आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिले होते. मात्र गेल्या काही दिवसंपासूनच्या आमरण उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचे दिसून आले. हे पाहून काल त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पाणी पिण्यासाठी आवाहन केले. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच तसेच सरकारने कुठलाही निर्णय दिला नसल्याचे पाहून समर्थकांनी बीडमध्ये बंदची हाक पुकारली होती. बीड मधील आमदार साळुंखे यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज पेटून उठला होता, काल त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत साळुंखे यांचा बंगलाच पेटवून दिला होता. तर सोलापूर येथे रस्त्यावर ठीक ठिकाणी जाळपोळ करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मराठा आरक्षणावर काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.