कलाकारांची मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राची वाट धरतात पण काही कलाकारांची मुलं या गोष्टीला अपवाद ठरली आहेत. वडील प्रसिद्ध अभिनेते असतानाही भरत जाधव म्हणा किंवा शरद पोंक्षे म्हणा या कलाकारांच्या मुलांनी डॉक्टर आणि पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. गेल्याच वर्षी शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे ही पायलट झाली होती. त्यावेळी कुठलेही आरक्षण न मिळवता स्वतःच्या बळावर उत्तम गुण मिळवून ती पायलट झाली अशा आशयाची त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. कारण या दरम्यान शरद पोंक्षे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी तोंड देत असतानाही त्यांची लेक सिद्धीने विज्ञान विषयात ८७ टक्के गुण मिळवले होते. या उत्तम गुणांमुळे सिद्धीला परदेशात जाऊन पायलट होता आले होते.
पण आता त्यांच्या लेकीने आणखी एक उंच झेप घेत फ्लाईट इन्स्ट्रक्टर बनण्याचं तिचं स्वप्न पूर्णत्वास आणलं आहे. आज ८ मार्च जागतिक महिला दिन आणि याच दिवशी आपली लेक इन्स्ट्रक्टर झाली याचा अभिमान त्यांना वाटत आहे. आपल्या लेकीच्या कौतुकात आज शरद पोंक्षे यांनी तिचे अभिनंदन करणारी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ” महिला दिनाच्या शुभेच्छा माझी मुलगी सिध्दी आधी पायलट व काल flight instructor झाली. स्वकष्टाने ,मेहनतीने,कोणाच्याही मदती शिवाय,तिने हे यश संपादन केलय.एका बापाला आणखी काय हव?अभिनंदन सिध्दी.” शरद पोंक्षे यांनी लेकीच्या कौतुकात लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सिद्धीने मिळवलेल्या या यशाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. शरद पोंक्षे यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पगडा आहे. त्यामुळे कित्येकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण या ट्रोलिंगला बाजूला करून त्यांनी आपला प्रवास असाच सुरू ठेवला आहे. ठीक ठिकाणी वीर सावरकरांवरील व्याख्यानासाठी त्यांना आमंत्रित केले जाते. काहीच महिन्यांपूर्वी नथुराम गोडसे हे नाटक त्यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर आणले होते तेव्हा त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता.