“मी महात्मा फुले यांचा खापर पणतू आहे…” दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी एका मुलाखतीतील हा खुलासा पहा

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी मराठी सृष्टीला मोठे योगदान दिलेले आहे. केवळ अभिनेते म्हणून नाही तर राष्ट्रीय सेवादल आणि अंधश्रद्धा निर्मूलनातही ते सक्रिय सहभागी होते. ‘बाई वाड्यावर या’ ही त्यांची खरी ओळख नसून एक समाजभान जपणारा संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेली आहे. त्यांची हीच ओळख जनमानसात व्हावी म्हणून त्यांची मुलगी गार्गी फुले त्यांच्यावर बायोपिक बनवत आहेत. पण अनेकांना माहीत नाही की निळू फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यात रक्ताच नातं आहे. महात्मा फुले यांचा मी खापर पणतू आहे असा खुलासाच त्यांनी एका मुलाखतीत करून दिला होता. (व्हिडिओत ६ व्या मिनिटाला हा खुलासा पाहायला मिळेल)
निळू फुले यांना आपल्यातून जाऊन १६ वर्षे लोटली आहेत. पण त्यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत निळू फुले सांगतात की, “मी महात्मा फुले यांचा खापर पणतू आहे. तीन चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो त्याअगोदर ही सगळी मंडळी खळद खानवडी या गावात राहत होती. अजूनही तिथे काही मंडळी तिथे आहेत.पण आम्ही तीन चार पिढ्या इथे आलो. फुले ज्यावेळी गंजपेठेत राहायला आले त्यावेळेपासून फुले मंडळी पुण्यामध्ये स्थायिक झाले तर त्यांच्यामधला मी!.”

बहुतेकांना ही मुलाखत पाहिल्यानंतर फुले कुटुंबाशी त्यांचं नातं काय आहे याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण आजच्या पिढीला या नात्याबद्दल क्वचितच काही गोष्टी माहिती असतील. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच निळू फुले यांची लेक गार्गी फुले यांनी मालिका सृष्टीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. Solitude Holiday या नावाने त्यांनी ट्रॅव्हलिंगचं ॲप सुरू केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून पर्यटकांना परदेशी ट्रिप बुक करता येणे शक्य होणार आहे.