बांधकामगार असताना कामावर मैत्रिणीला विजेचा शॉक लागलेला पाहून वाचवायला गेली अन स्वतःच .. निर्मात्याने अपंग महिलेला मिळवून दिल हक्कच घर
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर ह्यांनी एका आपण महिलेला दिलेला शब्द पाळला आहे. सर्वसामान्य माणसाला घर घेणं ही खूप लांबची गोष्ट आहे. पण अपंगत्वावर मात करत असलेल्या महिलेला निर्माते महेश टिळेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी टिळेकरांचा हवाहवाई चित्रपट आला तेंव्हा ह्या महिलेला घर मिळवून देईल असं टिळेकरने कबुल केलं होत. त्यावर वर्षा उसगावकर ह्यांनी “महेश टिळेकर काहीही करतील पण तुला घर नक्की मिळवून देतील असं म्हटलं होत. ” आणि आज ते सत्यात देखील उतरलं. याबद्दल महेश टिळेकर म्हणतात की, “भगवान के यहां देर है अंधेर नहीं. माझ्या हवाहवाई सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मी आणि वर्षा उसगावकर यांनी पुण्यात आपल्या अपंगत्वावर मात करून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जिद्धी महिलेची भेट घेऊन तिची प्रेरणादायी कहानी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजा पुढे मांडली होती. एका इमारतीच्या बांधकामावर मंजूर म्हणून गरोदर सुनिता काम करत असताना सहकारी महिलेला विजेचा शॉक लागला म्हणून वाचवायला गेली आणि त्यात तिलाही अपघात होऊन कोपरा पासून दोन्ही हात गमवावे लागले.
बायकोची दयनीय अवस्था पाहून सुनीताचा नवरा तिला वाऱ्यावर सोडून पळून गेला. इतर कुणाचाही आधार नसलेली सुनिता आत्महत्या करायचा विचार करू लागली पण परमेश्वराने तिला काय बुद्धी दिली आणि तिला दुसऱ्या क्षणी वाटले की फक्त आपण आत्महत्या करत नाही तर आपल्या पोटातील बाळाची आणि पदरी असलेल्या एका मुलीची पण हत्या करून पाप करत आहोत. यातून स्वतः ला सावरत सुनिता ने एका पत्र्याच्या शेड मध्ये नव्याने जगायला सुरुवात केली.. अपंग असूनही घरातील सगळी कामे ती करायला शिकली आणि त्यात तरबेज झाली..मुलांना वाढवू लागली. सुनीताला शक्य तितकी मदत मी केली, तिच्या घरी मी आणि वर्षा उसगावकर गेलो होतो तेंव्हा तिने एक इच्छा व्यक्त केली की कुठे तरी भले एक खोली का असेना तिच्या डोक्यावर कायम स्वरूपी हक्काचं छप्पर असावे. त्यासाठी सरकारी योजनेतून मार्केट रेट पेक्षा स्वस्त घर मिळवण्यासाठी प्रयत्न केले. उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घर मंजूर केले.पण कागदपत्रे जमवताना अडचणी आल्या. स्थानिक नेत्याने मदत करतो असे बडेजाव करत सांगत सुनीताला महिनाभर चकरा मारायला लावून कामे केले नाहीच. तिचे फोन घेणे ही टाळू लागला. मग मी ज्या ज्या अधिकाऱ्यानां फोन केले संपर्क साधला त्या प्रत्येकाने एका शब्दावर काम केले.
अडचणीतून मार्ग निघत गेला. सरकारी घर मंजूर झाले तरी ते फुकट नसल्याने बाहेर पेक्षा कमी असले तरी पैसे भरावे लागणार होते.सुनीताला ती रक्कम ऐकून वाटले लाखो रुपये आणायचे कुठून. तिने ” सर तुम्ही तरी किती करणार माझ्यासाठी..” असं म्हणत आशा सोडली. पण मी पैशाची व्यवस्था केली. सुनीताला फ्लॅटची चावी मिळाल्यावर सुनीताने माझ्या समोर तिला चकरा मारायला लावणाऱ्या स्थानिक नेत्याला फोन केल्यावर त्याने ” तुझे काम होणे अवघड असे” असे सांगितल्यावर मी त्याला सुनीताचे घर झाले सांगत फोन वरून त्याला पोटभर दिवाळीचा फराळ दिल्यावर मला समाधान मिळाले. आज दिवाळी निमित्ताने पत्र्याच्या शेड मध्ये राहणारी सुनिता हक्काच्या वन बी एच के फ्लॅट मध्ये रहायला गेली. तिच्या नवीन घरात गेल्यावर तिचे आणि तिच्या मुलांचे उजळलेले चेहरे पाहून वाटलं दिवाळीत दिव्यांनी लोक घर उजळतात आपण एका गरीब कुटुंबातील अंधार कायमचा दूर करून घर आयुष्य उजळवून टाकायला निमित्त मात्र ठरलो ही त्या परमेश्वराची कृपा.. खरंच भगवान के यहां देर है अंधेर नहीं” – महेश टिळेकर