“माझ्या भल्या मोठ्या स्वप्नांवर इमारत कोसळली”…प्रसिद्ध अभिनेत्रीने घातले थेट मुख्यमंत्र्याकडे गाऱ्हाणे
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका देशपांडे सध्या बालनाट्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. याच नाट्यचळवळीच्या निमित्ताने तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिची अडचण सांगितली आहे. त्यात ती सविस्तर लिहिते की, ” आदरणीय मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी, केस सहा महिन्या पूर्वीची आहे. दिनांक ६ मार्च ची,अर्ज होता मालमत्ता विभाग, पुणे महानगर पालिका. मागणी कसली, स्वप्नं होती माझी. पण आता त्या स्वप्नांवर भलीमोठी इमारत कोसळली. तुम्ही भला माणूस आहात, सगळ्यांचं ऐकता. महाराष्ट्राची जनता मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहते. साहेब हे खुलं पत्र तुम्हाला लिहिते आहे. मी एक कलाकार आहे आणि महाराष्ट्रातली जनता मला ओळखते. अभिनेत्री म्हणून मी काम तर करतेच पण गेली अकरा वर्षं मी बालनाट्यासाठी माझं योगदान देते आहे. अजूनही “चळवळ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालरंगभूमीची सेवा मी करते आहे.
मुद्दा सोप्पा आहे आणि थोडक्यात सांगते साहेब. मला जागा हवी आहे. सवलतीच्या दरात भाडे तत्वावर Prime location बाणेर येथे. म्हणून अशी जागा जी सरकारची आहे पण जनसामान्यांच्या सांस्कृतिक विकासासाठी ती देऊ शकतात. मी अर्ज केला. चार जागांची पाहणी केली आणि एक जागा निवडली. १५०० चौ. फूट जागा होती. होतीच म्हणावं लागेल. त्याचं भाडं अंदाजे किती येईल? हे मला शेवट पर्यंत स्पष्ट सांगण्यात आलं नाही. आज सांगितलं मॅडम भाडं दर महा रु ८०,००० च्या घरात! कारण जागेच्या किमतीच्या ५% प्रमाणे बसवता आहेत. ह्या आधी का सांगितलं नाही? कारण “कमिटी बसते”, “वरिष्ठ ठरवतात”. कमिटी बसली ती बसलीच. सहा महिने काही उठलीच नाही. गणपती बाप्पा सुद्धा १० दिवसात उठतो. वरिष्ठ ठरवतात? हे कोण वरिष्ठ आहेत? कुठल्या बेसिस वर ते ठरवतात की १२%, ७%, ५% का १% टक्क्यावर द्यायची ते? “ते मॅडम तेच ठरवतात, पण नशीब जर चांगलं असेल ना मॅडम तर १% वर ही मिळेल बघा.” मी म्हटलं बघू प्रयत्न करून. मी विचारलं, मला अंदाज तर द्या किती पैसे दर महिना द्यावे लागतील? वाट पहा मॅडम, ते लेटर आल्याशिवाय काही सांगता यायचं नाही. मी सहा महिन्यात ६ वेळा मालमत्तेच्या इमारतीत जाऊन आले. मॅडम ते लेटर आलेलं नाही अजून. एक महिन्या अगोदर कळलं ५% वर देण्याचं ठरवलं आहे. पण अधिकाऱ्यांची सही राहिली आहे. “बरं पण भाडं किती होईल? “ते सांगतो“. आज सांगितलं.
मला गम्मत वाटते. त्यांनाही गम्मतच वाटत असेल नाही! एवढी मोठी रक्कम एका शिक्षिकेला जी लहान मुलांनवर नाट्य संस्कार करते, कशी परवडेल? मला खरंच वाटलं गम्मत केली की काय म्हणून मी परत विचारलं तर म्हणाले “हो, हीच रक्कम आहे”. एक महिन्यानी टेंडर निघेल कारण साहेबांची सही राहिली आहे. त्यांची सही घ्यायलाच आठ आठ दिवस लागतात. मी समजूच शकते कारण सहा महिने झाले मी समजूनच घेते आहे. पण खरं आहे खूप कामं आहेत मालमत्ता विभागात. एखाद्या महिलेच्या स्वप्नांचा गर्भपात झाला तर त्यांना काय फरक पडतो. मी काय तुमची शेजारीण नाही का नात्यात नाही. मी खचले, सुन्न होऊन खालीच बसले. माझ्या मुलीनं मला सावरत विचारलं, “आई तुला वाईट वाटतं आहे ना खूप”. मी म्हटलं, “बेटा, एक लक्षात आलं आहे माझ्या, मला सावरायला हवं. एक एक करून वेचायला हवं माझ्या विखुरलेल्या स्वप्नांना. त्या वास्तूत लहान लहान मुलं हसत खेळत अभिनयाचे धडे घेताना मी पाहिले, कुजत सडत पडलेल्या वास्तूच्या छपराला ओल आली होती, आणि एका ठिकाणी जमीन फुगली होती ती मी दुरुस्त करताना दिसत होते, समोरचं एक शंकराचं मंदिर आहे दुर्लक्षिलेलं, त्याचा जिर्णोद्धार मी मुलांकडून करून घेताना दिसत होते. मालमत्ता विभागात मुलांना नेऊन पेढे वाटताना दिसत होते. शेवटी त्यांना पण कळायला हवं, सरकार के घर देर है अंधेर नहीं. पण मी भाबडी स्वप्न पाहिली. मला माहिती आहे लोक मला मुर्खात काढणार. असं काही सरकारच्या दरबारी काम होत असतं का? तू जायलाच नको होतं. हाती दो भिगा जमीन नाही हातात कुचकी शब्दांची भेळ असलेली कागद पत्रच लागणार.” माझी मुलगी म्हणाली, “आई तू लिही, व्यक्त हो. मनात ठेऊ नकोस ह्या गोष्टी.”
एकनाथजी शिंदे साहेब मला तुम्हाला हे सांगायचं होतं. मला वेळ दिलात तर तुम्हाला सगळं क्रमशः सांगू शकते. खरंच नाही का तुम्ही जागा १% नी देऊ शकत? निदान नाट्य संस्कारासाठी? नाट्यचळवळ चालू राहण्यासाठी? राज्यातली सांस्कृतिक चळवळ चालू राहण्यासाठी? लहान लहान मुलांच्या आनंदासाठी? अचानक गाडीतून उतरून तुम्ही जनतेची मदत करता. तुमची गाडी पुण्याच्या दिशेने वळेल का? निदान एवढं तरी सांगा की, “इमारती खाली दबलेल्या तुझ्या स्वप्नांना सांग श्वास घेत राहा. सरकार लोकांचं आहे, लहान मुलांचं सुद्धा आहे. मदती करता धावून येत आहे.” तुमच्या उत्तराच्या अपेक्षेत-राधिका देशपांडे.