स्टार प्रवाहवरील मुरांबा ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अक्षयला स्मृतीभ्रंश झाल्याने तो मागचं सगळं काही विसरला आहे. पण हळूहळू तो रमासोबत लग्न झाल्याच्या गोष्टी लक्षात आणत आहे. दरम्यान या मालिकेतून सीमा मुकादम या पात्राची एक्झिट होत असल्याचे बोलले जात आहे. अक्षयची आई सीमा मुकादमची भूमिका अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने वठवलेली पाहायला मिळाली होती. सुलेखा तळवलकर यांनी आजवर विरोधी भूमिका गाजवलेल्या पाहायला मिळाल्या होत्या.
पण अक्षयची आई म्हणून त्यांनी ही सकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवली होती. पण आता नव्या मालिकेसाठी सुलेखा तळवलकर मुरांबा ही मालिका सोडत असल्याचे बोलले जात आहे. झी मराठीवर सावळ्याची जणू सावली या मालिकेत सुलेखा तळवलकर खलनायिका साकारत आहेत. तिलोत्तमा मेहेंदळे असे त्यांच्या या नवीन भूमिकेचे नाव आहे. सावळ्याची जणू सावली या मालिकेत त्या नायकाची आई आहेत. सावळ्या रंगावर त्यांना प्रचंड राग आहे. पण मालिकेची नायिका सावळी असल्याने ते तिचा सून म्हणून स्वीकार करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मालिकेत प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर,विना जगताप, पूनम पाटील, गौरी किरण अशी भली मोठी स्टार कास्ट पहायला मिळत आहे.
सुलेखा तळवलकर यांना पुन्हा एकदा दमदार भूमिका मिळाल्याने या मालिकेसाठी त्या मुरांबा मालिका सोडणार का हे पाहावे लागेल. कारण या दोन्ही मालिकेच्या शुटिंगचे ठिकाण वेगवेगळे आहे. त्यामुळे ही तारेवरची कसरत करणे त्यांना थोडेसे कठीण जाणार आहे. मुरांबा मालिकेत त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकाराला संधी दिली जाणार का? हे लवकरच समोर येईल. तूर्तास सावळ्याची जणू सावली मालिकेसाठी सुलेखा तळवलकर यांचे अभिनंदन.