मालिकांच्या कथानकावर नेहमीच प्रेक्षकांची ओरड सुरू असते. वेगवेगळ्या ट्विस्टमुळे तर प्रेक्षक लेखकाला शिव्यांची लाखोली वाहताना पहायला मिळतात. यावर काही दिवसांपूर्वी मालिका लेखिका मुग्धा गोडबोले हिने पुस्तकच प्रकाशित केलं होतं. मालिका लिहिताना लेखकाला तारेवरची कसरत करावी लागत असते. रोज अर्धा तास प्रेक्षकांसमोर काय दाखवायचं? हा प्रश्न त्यांना सतत पडलेला असतो. पण त्यातूनही प्रेक्षक ट्रोल केल्याशिवाय राहत नाहीत. याच मुद्द्यावर लेखक अभिजित गुरू यानेही त्याचं मत मांडलेलं पहायला मिळत आहे. अभिनित गुरू हा अभिनेता, लेखक, सहाय्यक दिग्दर्शक आहे. अवघाची संसार, पुढचं पाऊल, देवयानी, झुंज, लक्ष, माझ्या नवऱ्याची बायको या आणि अशा कित्तीतरी मालिका, चित्रपटासाठी त्याने लेखन केले आहे.
पण हे लेखन करत असताना प्रेक्षकांच्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागते. यावरून अभिजितने भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत त्याचे मत मांडले आहे. अभिजित गुरू या ट्रोलिंगला उत्तर देताना म्हणतो की, ” मालिका एक कठीण माध्यम आहे कारण ते रोज लिहावं लागतं. त्याने कुठेतरी मेंदू थकतो. मी स्वतः ओटीटीचा प्रेक्षक आहे मालिकांचा नाही. मला खूप लोकं म्हणतात की याच्यातन आम्ही काय शिकायचं?….नाहीच शिकवत आहे आम्ही, शिकवण्यासाठी पुस्तकं आहेत, शिकवण्यासाठी शाळा आहेत, महाविद्यालय आहेत. तिथे जाऊन शिका…जसं बंद करा म्हणणारे आहेत ना तसं का बंद केली? असंही विचारणारे पण आहेत. ज्यांच्यासाठी बंद व्हावीशी वाटते त्यांना रिमोट दिले आहेत. तुम्ही टीव्ही बंद करू शकता. ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही बघायच्या.बस एवढंच करायचंय, बाकी काही नाही करायचं… “
लग्न करून सासरी गेलेल्या मुलींच्याही बाजूने तो म्हणतो की, “हॅट्स ऑफ टू यु , सासू आणि सुनेचं रिलेशन हे सगळ्यात डीफिकल्ट रिलेशन आहे. आपण २२- २५ वर्ष ज्या घरात घालवलेत त्या सगळ्यांना सोडून तुम्हाला एका वेगळ्याच रिलेशनशिपमध्ये, वेगळ्याच लोकांबरोबर जमवून घेण्यासाठी वेगळ्याच घरात राहावं लागतं . नवरा बायकोच्या रिलेशनशिपमध्ये पण मॅक्सिमम प्रॉब्लेम काय असतो? यावर कथानकाचा बराचसा भाग अवलंबून असतो”.