हिंदी चित्रपटातून नायक नायिकेचा श्रीमंत बाप कोणी वठवला असेल तर तो मराठमोळ्या गजानन जागिरदार यांनी. पिळदार मिश्या, डोळ्यांवर चष्मा आणि कोट या पेहरावामुळे गजानन जागिरदार हे चित्रपटातून रुबाबदार बाप म्हणून परिचयाचे बनले. मै चूप रहुंगी या चित्रपटात त्यांनी मीना कुमारीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अशा अनेक भूमिकांसाठी गजानन जागिरदार यांना ओळखले जाते हे विशेष. बालकलाकार ते चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवल्या होत्या. २ एप्रिल १९०७ रोजी अमरावती येथे त्यांचा जन्म झाला. नाटकाची आवड असल्याने बालपणापासूनच ते नाटकातून काम करत असत मात्र घरातून विरोध होऊ लागल्याने पुढे जाऊन त्यांनी घर सोडले. नाटकासाठी मी घर सोडले अशी एक चिठ्ठी त्यांनी वडिलांना लिहिली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळावे या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १९३० साली त्यांनी आपल्या मित्रांसोबत नाटक सोडून दांडी यात्रेत सहभागी होण्याचे ठरवले, मात्र भयंकर तापामुळे ते तसेच झोपून राहिले. कोल्हापूरला काही काळ शिक्षकाची नोकरी केली. मुलगा मार्गी लागला म्हणून त्यांच्या वडिलांनाही आनंद झाला. पुढे कोल्हापुला गेल्यावर जागिरदार यांची व्ही शांताराम यांच्याशी मैत्री झाली. प्रभात फिल्म्स कंपनीत त्यांना दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ‘रामशास्त्री’ हा प्रभातचा त्याकाळी गाजलेला ऐतिहासिक चित्रपट. याचे दिग्दर्शन गजानन जागिरदार यांनी केले. पायाची दासी, सिंहासन, वसंतसेना अशा मराठी तसेच मिठा जहर, तलाक अशा हिंदी चित्रपटातून त्यांनी कधी अभिनय तर कधी दिग्दर्शन केले. प्रभातच्या एका चित्रपटात जागीरदार यांनी लोकमान्य टिळकांची व्यक्तिरेखा साकारली. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
मात्र टिळकांच्या वेशातील जागिरदारांचा एक फोटो लोकमान्य यांचाच आहे असा समज रुजला. दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित महात्मा चित्रपटात जागिरदार मुख्य भूमिकेत झळकले होते. या व्यक्तिरेखेचे बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्र काढले होते. दूरदर्शनवरील स्वामी या मराठी मालिकेचे त्यांनी दिग्दर्शन केले. ही त्यांची मालिका खूप लोकप्रिय ठरली होती. १३ ऑगस्ट १९८८ रोजी गजानन जागिरदार यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा अशोक जागिरदार यांनी त्यांची दुर्मिळ छायाचित्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहलायकडे सुपूर्द केली होती.