प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आम्ही जे करतोय दाखवतोय…आई कुठे काय करते मालिकेच्या ट्रोलिंगवर सतीश राजवाडेची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या प्रोमोमध्ये आशुतोषला मृत्यू येतो असे धक्कादायक वळण दाखवण्यात आले होते. त्यानंतर अरुंधतीला घरातून हाकलून लावण्यात आले. माझ्या मुलाच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस चालती हो घरातून असे आशुतोषची आई अरुंधतीला म्हणते तेव्हा तिला सावरण्यासाठी कांचन आजी पुढे येते. मालिकेचा हा प्रोमो पाहून तमाम प्रेक्षकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. मालिका लवकरात लवकर संपवावी अशीही मागणी करण्यात आली. स्त्रीच्या आयुष्यात चांगलं काही घडतच नाही का, तिला प्रत्येकवेळी हिनवण्यात येतं आणि कुठल्याही वाईट गोष्टीसाठी तिला जबाबदार धरलं जातं हे मालिकेतून दाखवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला होता. पण आता स्टार प्रवाह वाहिनीचे हेड सतीश राजवाडे यांनी याबाबत एक विधान केलेले पाहायला मिळत आहे.
मालिका निरोप का घेत नाही या प्रश्नावर ते म्हणतात की, “मालिकेच्या प्रोमोवरून लोकांनी अक्षरश जे नाही ते ऐकवलं आहे. जर ते मालिका डोक्यावर घेऊ शकतात तर ते विरोधही करू शकतात. त्यांचा तो हक्क आहे आम्ही तो हक्क त्यांना दिला आहे. ह्याच रसिक प्रेक्षकांनी ही मालिका सुपरहिट केली आहे. जर ते ही मालिका सुपरहिट करू शकतात तर ते मालिकेवर बोलुही शकतात. आम्ही त्यांच्या भावना समजू शकतो. पण मालिका प्रगल्भ करायची असेल तर हे वळण गरजेचे होते. आज आपण पाहतो की आपल्याला कठीण काळात आईची गरज असते, पण त्या आईलाही कोणाची तरी गरज असतेच तेव्हा तिच्या बाजूने कोणीच नसतं. आईची बाजू घ्यायला आई असावी लागते पण तिच्या बाजूने कोणीच नसतं. जर सासू सुनेच्या बाजूने असेल तर मला हे अखंड महाराष्ट्राला दाखवायचं आहे. त्यामुळे मालिकेत हे वळण गरजेचं होतं.
प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे , आम्ही जे काही करतोय, जो काही प्रवास दाखवतोय तो तुम्ही बघा आणि मग सांगा की हे चूक आहे की बरोबर. ” घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लॉन्च सोहळ्यात सतीश राजवाडे यांनी हजेरी लावली होती. काल बुधवारी पुण्यातील ढेपे वाड्यात हा सोहळा पार पडला त्यावेळी माध्यमांनी सतीश राजवाडे यांची मुलाखत घेतली. तेव्हा आई कुठे काय करते या मालिकेच्या ट्रोलिंगबाबत त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. आई कुठे काय करते या मालिकेचे एक एक टप्पे पुढे जात आहेत त्यातलाच हा एक महत्वाचा टप्पा आहे जो आईला समजावून घेऊ शकतो. त्याचमुळे सतीश राजवाडे यांनी केलेले हे वक्तव्य प्रेक्षकांनाही पटलेलं दिसून येत आहे.