३० ऑक्टोबर रोजी ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२१’ हा सोहळा प्रसारित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात मालिकेच्या कलाकारांनी एक दोन हिंदी गाणी वगळता मराठी गाण्यांवर ठेका धरलेला पाहायला मिळाला हे विशेष म्हणावे लागेल. कारण आजवर मराठी पुरस्कार सोहळ्यात कित्येकदा हिंदी गाण्यालाच प्राधान्य दिलेले दिसते. परंतु असे असले तरी बॉलिवूड कलाकारांना ह्या सोहळ्यात आमंत्रित करणे अनेकांना रुचले नाही त्यात भर म्हणजे कतरिनाला पैठणी आणि नथ देऊन तिचा सन्मान करण्यात आला त्यावेळी कतरिना खरंच ही साडी नेसणार का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

झी मराठी पुरस्कार सोहळ्याबाबत आणखी एक नाराजी प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे की हे पुरस्कार त्या योग्य व्यक्तीला कलाकाराला दिले गेले नाहीत असा एक नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे. चर्चेत राहिलेला चेहरा, उत्कृष्ट आई असे तब्बल तीन पुरस्कार प्रार्थना बेहरेला देण्यात आले तर संकर्षण कऱ्हाडेला देखील आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर या पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले तर बालकलाकार म्हणून मायराला आणि मैत्रीचा पुरस्कार यश आणि समीर यांना दिला गेला. विशेष म्हणजे मानसी मागिकर आणि मोहन जोशी यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर शेफालीच्या भूमिकेला देखील पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने पुरस्कार मिळवण्यात बाजी मारलेली दिसून येते. खरं तर मालिका आणि मालिकेच्या कलाकारांवर प्रेक्षकांचे खूप प्रेम आहे हीच त्यांच्या अभिनयाची पावती म्हटली जात आहे मात्र एकीकडे हे पुरस्कार दिले जात असताना भावी सून, भावी सासू हे पुरस्कार झी वाहिनीने कशासाठी आणले? हा प्रश्न आता वाहिनीच्या प्रेक्षकांना पडला आहे.

भावी सून म्हणून स्वीटूला हा पुरस्कार मिळाला तर भावी सासू म्हणून ओमच्या आईला म्हणजेच शकूला पुरस्कार दिला. जर स्वीटूने मोहित बरोबर लग्न केले आहे तर ती भावी सून कशी असू शकते? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. भावी सून म्हणून तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदीतील का नाही दिला गेला असेही प्रेक्षकांनी म्हटले आहे. त्याचसोबत भावी सासू म्हणून सिद्धूच्या आईला हा पुरस्कार द्यायला हवा होता. उत्कृष्ट भावी सासू म्हणून शकूला पुरस्कार देणे कितपत योग्य आहे. अशाने इतर मालिकेच्या कलाकारांना मुद्दामहून टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असाही प्रश्न याबाबतीत उपस्थित केला जात आहे. आणखी भावी सासू किंवा चर्चेत असलेला चेहरा म्हणून मन उडू उडू झालं या मालिकेतील दिपूला देखील देण्याचा विचार व्हायला हवा होता. प्रेक्षकांनी ज्या कलाकारांना पसंती दर्शवली होती तो पुरस्कार योग्य व्यक्तीला देण्यात आला नसल्याने सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत काहीसा नाराजीचा सूर देखील आता उमटताना दिसत आहे.