झी मराठी वाहिनीवर आता नव्या दमाच्या मालिका प्रसारित होत आहेत. येत्या काही दिवसातच झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आणखी दोन नव्या मालिका घेऊन येत आहे. रात्री ८ वाजता प्रसारित होत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्या जागी येत्या २० मार्च पासून ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. तू तेव्हा तशी ही मालिका राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट असणार आहे. ज्यात स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

वयाची चाळीशी ओलांडलेल्या मैत्रीची ही प्रेमकहाणी दमदार कलाकारांमुळे प्रेक्षक देखील स्वीकारतील अशी आशा आहे. मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून येत्या २० मार्चपासून तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या मालिकेसोबतच झी मराठी वाहिनी आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘बँड बाजा वरात’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. बँड बाजा वरात हा एक रिऍलिटी शो असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता शो च्या पहिल्या प्रोमोमधून वाढली आहे. एका कलशावर ‘झी मराठीकडून सप्रेम…’ असे लिहितानाचा मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला त्यामुळे हा शो लग्नसोहळ्याशी निगडित असावा असा अंदाज बांधला जात आहे . झी मराठी वाहिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून असा एक शो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तो म्हणजे होम मिनिस्टर. आदेश बांदेकर यांनी या शोची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. त्यामुळे त्याच धाटणीचा हा शो असावा असे वर्तवले जात आहे.

या शोच्या एंट्रीमुळे झी मराठी वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘हे तर काहीच नाय’ या मंचावर अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींनी हजेरी लावली आहे. आपल्या आयुष्यात घडलेले किस्से या मंचावर या सेलिब्रिटींनी शेअर केले आहेत. स्वर्गीय रमेश देव यांच्या आयुष्याचा सोनेरी आणि तितकाच अविस्मरणीय क्षण या शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. मात्र लवकरच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९.३० वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो त्यामुळे आता या वेळेत ‘ बँड बाजा वरात’ हा नवा शो प्रसारित केला जाणार आहे असे बोलले जात आहे. बँड बाजा वरात या नव्या शोच्या पुढच्या प्रोमोमधून याबाबत लवकरच उलगडा होणार आहे. परंतु या शोचे सूत्रसंचालन कोण करणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहणार आहे.