झी मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसांत अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. वाहिनीचा घटलेला टीआरपी पुन्हा परत मिळवण्यासाठी वाहिनीने हा मोठा प्रयत्न केला आहे. दरम्यान झी मराठीच्या मालिका टॉप १४ ते ३० च्या घरात पोहोचल्या आहेत त्यामुळे वाहिनीला अजून थोडी मेहनत घेणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने वाहिनीने एका मालिकेला निरोप द्यायचा निर्णय घेतला आहे. झी मराठीची निरोप घेत असलेली ही मालिका आहे अप्पी आमची कलेक्टर. झी मराठीवरची अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत अर्जुन आणि आर्याचे लग्न होऊ नये म्हणून सिंबा धडपड करत आहे. पण रुपाली आणि मोना त्यांचे नवे डाव आखत आहेत.
एकीकडे आपले आईबाबा पुन्हा एकत्र यावेत म्हणून हा सिंबा रुपाली आणि आर्याला तोंडावर पाडताना दिसत आहे. त्यांचे डाव उधळून लावण्यात तो आता यशस्वी होत असून मालिकेचा शेवट गोड होईल असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान सिंबामुळे मालिकेला चांगला टीआरपी मिळाला हे विसरून चालणार नाही साइराज केंद्रे याने त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आणि मालिकेला टीआरपीदेखील मिळवून घेतला. पण आता या मालिकेच्या जागी महेश कोठारे यांची मालिका दाखल होत आहे. “सावळ्याची जणू सावली” असे या नव्या मालिकेचे नाव असणार आहे.
रंग तिचा सावळा तिच्या गोड आवाजाचा लागेल लळा असे म्हणत मालिकेच्या पहिल्या प्रोमोची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जय मल्हार या मालिकेनंतर तब्बल ९ वर्षांनी महेश कोठारे झी मराठीवर ही मालिका घेऊन येत आहेत. त्यामुळे झी वाहिनीसोबत पुन्हा काम करण्याची त्यांनी उत्सुकता दाखवली आहे. मालिकेत कोणकोणत्या कलाकारांना संधी मिळते आहे ते लवकरच जाहीर करण्यात येईल पण तूर्तास अप्पी आमची कलेक्टर ही लोकप्रिय मालिका निरोप घेतेय म्हटल्यावर प्रेक्षक नक्कीच नाराज होतील.