झी मराठी वाहिनीवर २००८ ते २००९ साली सारेगमप लिटिल चॅम्प्सचा शो प्रसारित झाला होता. कार्तिकी गायकवाड हिने या पहिल्या शोचे विजेतेपद पटकावले होते. तर रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे या बालगायकांनाही या शोमधून अमाप प्रसिद्धी मिळाली होती. इतक्या वर्षानंतर आजही हे कलाकार मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून गेले आहेत. आता लवकरच पुन्हा एकदा नव्याने झी मराठी वाहिनी सारेगमप लिटिल चॅम्प्स हा शो प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

नुकतेच या शोच्या आयोजकांनी ५ ते १५ वर्षाखालील बालगायकांचे गाण्याचे व्हिडीओ पाठवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच या बालगायकांना आता झी मराठी वाहिणीवरच्या सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नव्या शोमध्ये गायनाची संधी मिळणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती झी वाहिनी वेळोवेळी टीव्ही माध्यमातून देईल. सारेगमप मराठी लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या सिजनमध्ये अभिनेत्री पल्लवी जोशी हिने सुत्रसंचालनाचे काम अगदी चोख बजावले होते. तसेच अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी या शोचे जज म्हणून भूमिका पार पाडल्या होत्या. परंतु आता लवकरच सुरू होत असलेल्या लिटिल चॅम्प्स २०२१ च्या शोमध्ये सूत्रसंचालन आणि जजच्या भूमिका कोण सांभाळणार हे अजून गुलदस्त्यात आहे. लिटिल चॅम्प्स म्हणून ओळख मिळालेल्या गायकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. त्यामुळे ह्या पर्वात लिटिल चॅम्प्स मधील काही कलाकार पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमीकेतून प्रेक्षकांसमोर येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. झी मराठी वाहिनी हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी आणत आहे याबाबत येत्या काही दिवसातच कळवले जाईल मात्र याची आतुरता आतापासूनच सर्वांना लागून राहिली आहे एवढे नक्की…