झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. एकापाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका झी वाहिनीने या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यामुळे झी वाहिनी आता आपला घटलेला टीआरपी पुन्हा वाढवणार का हे पाहावे लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवर नवा गडी नवं राज्य, तू चाल पुढं, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई, सातव्या मुलीची सातवी मुलगी, लोकमान्य अशा मालिका सुरू करून प्रेक्षकांचि पसंती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मालिकेला टीआरपी कमी मिळेल त्या मालिका झी वाहिनीने ताबडतोब बंद पडल्या आहेत त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे प्रेक्षकांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे दिसून येते.

नोव्हेंबर महिन्यात झी मराठी वाहिंजने ‘हृदयी प्रीत जागते’ ही नवीन मालिका सुरू केली होती. पूजा कातूर्डे आणि सिद्धार्थ खिरीड यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका बजावली होती. मात्र प्रभास आणि विणाच्या या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी पुरेसा प्रतिसाद दिला नसल्याने या मालिकेने आता इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे या मालिकेच्या जागी प्रेक्षकांना एक नवी मालिका पाहायला मिळणार आहे. ही नवी मालिका म्हणजेच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. येत्या १३ मार्च २०२३ पासून रात्री ८ वाजता ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून ऋषीकेश शेलार आणि शिवानी रांगोळे प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून ऋषीकेशने दौलत या खलनायकाची भूमिका चांगलीच गाजवली होती. या भूमिकेमुळे ऋषीकेशचे सर्वत्र कौतुक झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने या पात्राला निरोप दिला होता त्यावेळी त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली होती. ऋषीकेशची पत्नी आणि मालिका अभिनेत्री स्नेहा काटे शेलार हिने काही दिवसांपूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला होता. आपल्या मुलीच्या आगमनाचा आनंद आणि त्याच्याच जोडीला नवीन मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका यामुळे ऋषीकेशचा आनंद द्विगुणित झालेला आहे.

तर ऋषीकेश सोबत शिवानी रांगोळे कुलकर्णी या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. शिवानी रांगोळे ही देखील उत्तम अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून शिवानी प्रमुख भूमिकेत झळकली होती. विराजससोबत लग्न झाल्यानंतर बावरलं रं या म्युजिक व्हिडिओत दिसली. आता ती झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून अक्षराची भूमिका साकारत आहे. अक्षरा ही शिक्षिका आहे, घराचा कारभार सांभाळत ही अक्षरा शाळेतील मुलांना देखील आपलेसे करणार आहे. त्यामुळे अक्षराची ही तारेवरची कसरत आणि आगळी वेगळी प्रेमकहाणी पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. या मालिकेतून कविता लाड मेढेकर बऱ्याच प्रतीक्षेनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधून या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहेत. त्यामुळे १३ मार्चची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे.