झी मराठीवरील शिवा मालिकेत दाखल होणाऱ्या अभिनेत्याला ओळखलं…२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मालिकेत एन्ट्री
झी मराठी वाहिनीने आजवर अनेक नवख्याकलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. त्यातील काही चेहऱ्यांना मोठी प्रसिद्धी देखीप मिळाली. अशातच आता झी मराठी वाहिनीने या कलाकाराला पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारण्याची संधी देऊ केली आहे. एका व्हिडिओत हा अभिनेता झी मराठीच्या वाहिनीत दाखल होत असल्याचे जाहीर केले आहे, मात्र त्याचा पाठमोरा व्हिडीओ असल्याने त्यांनी या कलाकाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. पण जाणकार प्ररक्षकांनी या पाठमोऱ्या अभिनेत्याला लगेचच ओळखले देखील आहे. हा अभिनेता आहे येऊ कशी तशी मी नांदायला मालिका फेम शाल्व किंजवडेकर. काही दिवसांपूर्वीच शाल्व किंजवडेकर याने मेकअप रूममध्ये बसलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
‘शुटिंगचा पहिला दिवस’ असे म्हणत त्याने पुन्हा मालिकेत पदार्पण करत असल्याची हींट दिली होती. त्यानंतर अनेकांनी तो झी मराठी वाहिनीच्या मालिकेत दाखल होतोय असे तर्क लावले होते. त्या दरम्यान पारू या नवीन मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आला होता. या मालिकेत प्रसाद जवादे प्रमुख भूमिकेत झळकणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शाल्व किंजवडेकर हा शिवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे म्हटले जात होते. पण त्यानंतर आता स्वतःच झी मराठीने यावरचा पडदा हटवून शाल्व शिवा मालिकेतून प्रमुख भूमिका साकारतोय अशी हिंट दिलेली आहे. शाल्व किंजवडेकर हा एक गुणी अभिनेता आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत त्याने चॉकलेट हिरोची इमेज बनवली आहे. शिवा या मालिकेचे नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आले आहेत मात्र या प्रोमोमध्ये अजूनही नायकाची भूमिका कोण साकारणार याबाबत गुप्तता बाळगली होती.
अभिनेत्री पूर्वा फडके म्हणजेच पूर्वा कौशिक शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. याअगोदर तिने अजूनही बरसात आहे या मालिकेत नायिकेच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पण झी मराठी वाहिनीने पूर्वाच्या कलागुणांना ओळखून शिवाची प्रमुख भूमिका साकारण्याची संधी देऊ केली आहे. तर नायकाच्या भूमिकेत शाल्व किंजवडेकर झळकणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. नायिकेला परिस्थितीमुळे कठोर भूमिका घ्यायला भाग पाडले आहे त्यामुळे मुलीपेक्षा ती मुलाच्या वेशातच वावरताना दाखवली आहे. तर नायकाची एकंदरीत भूमिका काय असेल हे शाल्वकडे पाहून तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल. तूर्तास झी मराठीवर पुनरागमनासाठी शाल्व किंजवडेकरचे अभिनंदन आणि या भूमिकेसाठी शुभेच्छा.