
झी मराठी वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. ‘देवमाणूस’, ‘अग्गबाई सुनबाई’, ‘कारभारी लयभारी’ या तिन्ही मालिकांमुळे वाहिनीचा टीआरपी घटल्याने या मालिका संवण्यावर भर दिला जात आहे. या तीन मालिकांसोबतच आता ‘माझा होशील ना’ ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसते. झी मराठी वाहिनीने नेहमीच दर्जेदार मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या मात्र स्टार प्रवाह वाहिनीला गेल्या काही दिवसांपासून चांगला टीआरपी मिळताना दिसत आहे.

याच चुरशीच्या स्पर्धेमुळे झी मराठी वाहिनीने आपल्या मालिकेत नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या तगड्या कलाकारांना घेऊन “माझी तुझी रेशीमगाठ”ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या मालिकेसोबतच तेजपाल वाघ “मन झालं बाजींद” ही नवी मालिका कारभारी लयभारी मालिकेच्या जागेवर आणत आहे. तर देवमाणूस मालिकेच्या जागी ‘ती परत आलीये’ मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. माझा होशील ना या मालिकेच्या जागी येत्या ३० ऑगस्ट पासून ” तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” ही मालिका प्रसारित होणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच आला असून या मालिकेत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री “अमृता पवार” झळकणार आहे. सोनी मराठी वरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून अमृता पवारने जिजामातोश्रींची भूमिका साकारली होती. ‘दुहेरी’ या मालिकेतून अमृताने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ललित २०५, जिगरबाज अशा आणखी काही मालिका तिने अभिनित केल्या आहेत. मुंबई विद्यापीठातून बी कॉम ची पदवी मिळवलेल्या अमृताला सीए व्हायचं होतं आणि यातच करिअर करायचं होतं मात्र कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा तिने गाजवल्या आणि अभिनयाची ओढ तिला लागली.

दुहेरी या पहिल्या वहिल्या मालिकेतून तिला प्रमुख भूमिका मिळाली. दुहेरी मालिकेमुळे अमृता प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. यातील नेहाच्या भूमिकेने अमृताला तुफान लोकप्रियता मिळाली. त्यामुळे पुढे सीए बनण्याचे तिचे स्वप्न अपूर्णच राहिले. या मालिकेनंतर ललित २०५ ही तिने अभिनित केलेली मालिकाही खूपच लोकप्रिय झाली. स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत जिजामातेची भूमिका तिने साकारली होती. मधल्या काळात अमृता आजारी असल्याने ही भूमिका भार्गवी चिरमुलेकडे आली. मात्र काही दिवसातच मालिकेने लीप घेतला आणि ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री निना कुलकर्णी यांच्याकडे आली. अमृता पवार आता झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेत झळकणार आहे.”तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकेत ती प्रमुख भूमिका बजावणार आहे. सासरकडच्या मंडळींची नावे ती प्रोमोमध्ये पाठ करताना दिसत आहे. त्यावरून ही नवी मालिका कशी असेल याचे तर्क आता प्रेक्षक बांधत आहेत. मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसातच अधिक स्पष्ट होईल तुर्तास या नव्या मालिकेनिमित्त अभिनेत्री अमृता पवार हिला शुभेच्छा…