कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेत दत्तजयंतीचा विशेष भाग सादर करण्यात आला. यावेळी बालशंकराने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सर्वच जण जय शंकरच्या निर्णयाने खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले. बालशंकरची भूमिका आपल्या अभिनयाने वठवणाऱ्या कलाकाराबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ही भूमिका साकारली आहे आरुष बेडेकर या बालकलाकाराने. योगयोगेश्वर जयशंकर मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या आरुष बेडेकरची ही पहिलीच मालिका असली तरी याअगोदर त्याने नाटकातून काम केले आहे. आरुष हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातला. त्याचे कुटुंबीय सध्या या ठिकाणीच वास्तव्यास आहे. एका कलाकार असलेल्या कुटुंबात आरुषचा जन्म झाला. त्याचे वडील प्रसाद बेडेकर हे शिक्षक तर आहेतच शिवाय ते नामवंत बेडेकर क्लासेसचे संचालक देखील आहेत.

यासोबतच त्यांना अभिनयाची देखील आवड आहे. अहमदनगर येथे होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रसाद बेडेकर यांनी सहभाग दर्शवला आहे मग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असो किंवा नाटकातून एखादी भूमिका साकारणे असो त्यांनी अशा विविध माध्यमातून कलेची आवड जोपासली आहे. वेगवेगळ्या मंचावर त्यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलतं केलं आहे. एवढेच नाही तर अंकुश चौधरी आणि पल्लवी पाटील यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ट्रिपल सिट’ या मराठी चित्रपटात त्यांनी एक महत्वाची भूमिका देखील साकारली होती. योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेतही प्रसाद यांना अभिनयाची संधी मिळाली असून त्यांनी आपल्या मुलांसोबत स्क्रीन शेअर केली होती. तर आयुषची आई अमृता बेडेकर या उत्कृष्ट गायिका आहेत. स्वरोहम या संगीत अकादमीची त्यांनी स्थापना केली आहे. या संस्थेमधुन त्यांनी अनेक नवख्या कलाकारांना संगीताचे धडे दिले आहेत. आई वडील दोघेही कलाकार असल्यामुळे आरुषला देखील याच क्षेत्रात येण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच आरुष बालनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी झालेला असायचा. उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिक देखील त्याने पटकावली आहेत. योगयोगेश्वर जय शंकर मालिकेसाठी आरुषचे ऑडिशन दिली होती.

यातून त्याची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली. उमा ऋषीकेश, अतुल आगलावे, निलेश सूर्यवंशी या कलाकारांनी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. नुकतीच अतुलची या मालिकेतून एक्झिट झाली आहे त्याने चिमणाजीचे पात्र साकारले होते. त्यानिमित्ताने तो ही मालिका सोडताना खूपच भावुक झालेला पाहायला मिळाला. मालिकेचा एक अध्याय आता संपत आला आहे त्यामुळे एक नवा अध्याय आणि नव्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाली पाटील हिने देखील या मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारली होती. बालशंकरच्या त्रैलोक्य भ्रमणाचा काळ आता सुरू झालेला असल्याने या मालिकेला एक नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे आता बालशंकरचा इथून पुढचा प्रवास कसा असेल याची उत्सुकता मालिकेच्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. योगयोगेश्वर जयशंकर मालिकेतील बालशंकर साकारणाऱ्या आरुष बेडेकर याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..