येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली पाहायला मिळते आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतेच मालविका आणि मोहितला त्यांच्या कारस्थानामुळे अटक करण्यात आली आहे. तर तिथेच मोहितने स्वीटूला घटस्फोटदेखील दिलेला पाहायला मिळतो आहे. या सर्व घडामोडी इतक्या अचानकपणे घडत असलेले पाहून मालिकेचे प्रेक्षक देखील अवाक झालेले पाहायला मिळत आहेत. मालिकेचा ट्रॅक इतक्या झटपट बदलण्यात येईल अशी अपेक्षा प्रेक्षकांनी केली नसल्याने हा त्यांच्यासाठी एक सुखद धक्का ठरलेला दिसतो आहे. मालविकाची कटकारस्थानं एवढ्या लवकर समोर आली आणि मोहितबरोबरच तिला देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका लवकरच आटोपती घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अर्थात अजून ओम आणि स्वीटूची प्रेमकहाणी पूर्णत्वास येण्यास जरा अवकाश आहे मात्र ही लव्हस्टोरी पुढे जाण्याआधीच आज ओम आणि स्वीटूच्या लग्नाची शूटिंग पूर्ण देखील झालेली समोर आली आहे. ओम सध्या स्वीटूला आपलंसं करायला गावी जाणार आहे. एका प्रोमोमध्ये ओम स्वीटूला भेटायला गावी जात आहे तिथेच या दोघांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यानंतर ओम आणि स्वीटू लवकरच लग्न देखील करताना दिसणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमध्ये ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटिंग आज पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या भागाची उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत अचानक आलेला हा ट्विस्ट गोंधळून टाकणारा जरी असला तरी या क्षणाची प्रेक्षकांनी आतुरतेने वाट पाहिली आहे. ओम आणि स्वीटू यांच्या लग्नाचा सोहळा मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यांच्या लग्नात मालविका देखील उपस्थित असणार आहे. यावरून बहुतेक प्रेक्षकांनी असा अंदाज बांधला आहे की, मालिका काही वर्षे लीप घेत आहे त्यानंतर मालविकाची सुटका होऊन ती आता खानविलकर कुटुंबात पुन्हा परतली जाणार.

आपल्याकडून झालेल्या सर्व चुका माफ करून मालविका पुन्हा एकदा आपल्या घरी परतणार आहे. त्यानंतर ओम स्वीटूच्या लग्नाची धामधूम पुन्हा एकदा मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार . हे सर्व आनंदाचे क्षण परत मिळवल्यानंतर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती मात्र स्वीटूचे मोहितसोबत लग्न झाल्यानंतर प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. त्यामुळे टीआरपीचया बाबतीत देखील ही मालिका कुठेतरी कमी पडत गेली. त्यामुळेच आता ही मालिका संपवली जात आहे असा अंदाज बांधण्यात आला आहे. अर्थात प्रेक्षकांनी बांधलेला हा अंदाज कितपत खरा ठरतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण ओम आणि स्वीटूच्या लग्नानंतर प्रेक्षक मात्र निःश्वास टाकतील हे मात्र नक्की…