झी मराठी वरील मालिका येऊ कशी कशी मी नांदायलामध्ये पुन्हा एकदा लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. मालिकेतील ओम आणि स्विटू दोघेही लग्न बंधनात अडकाताना दिसणार आहेत. सध्या मालिकेत या दोघांच्या लग्नाची थोडी लगबग पाहायला मिळतेय. आता बातमीचा मथळा वाचून तुम्ही म्हणाल या आधी पण लग्न करणार करणार म्हणाले होते. मात्र मालिकेला वेगळचं वळणं लागलं आणि लग्न काही झालच नाही. पण थांबा कारण या वेळी असं काही घडणार नाही.

दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न बंधनात अडकताना दिसणार आहेत. या दोघांच्या लग्नाचा एपिसोड १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. रविवारचा एक तासाचा विशेष भाग सर्वच प्रेक्षकांसाठी फुल टू पैसा वासून ठरणार आहे. लग्नाला जेलमध्ये शिक्षा भोगत असलेली मालविका देखील येणार आहे. आता मालविका येणार म्हणजे विघ्न पक्क असा तुम्ही विचार करत असाल. मात्र चिंता करण्याचं काहीच करण नाही. कारण या दोघांच्या लग्नाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच पार पडले आहे आणि तेही निर्विघ्न. रत्नागिरीत जयगडमधील कचरे या छोट्याशा गावात विनायकाचे एक मंदिर आहे. याचं मंदिरात दोघांचे लग्न पार पडणार आहे. सुरुवातीला ओम स्विटूला प्रपोज करताना दिसेल आणि मग लगेचच लग्न होताना दिसणार आहे. कचरे गावातील या मंदिराविषयी बोलायचे झाल्यास २००३ साली या मंदिराची स्थापना झाली. गावातील जिंदाल मंडळाने हे मंदिर उभारले. तुम्हाला इथे भेट द्यायची असल्यास रत्नागिरी बस स्थानकापासून मंदिर जवळपास ३७ किलोमिटर अंतरावर आहे आणि गणपती पुळे १३ किलोमिटर अंतरावर आहे. तसेच ६ किलोमिटरवर जयगडचा किल्ला देखील आहे.

त्यामुळे या ठिकाणी आल्यावर अनेक व्यक्ती विनायकाच्या मंदिराला देखील भेट देतात. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला मूषकराजाचे दर्शन होते. इथे हनुमाची देखील एक मूर्ती आहे. जिची उंची ६ फूट एवढी आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर देखील नयनरम्य आहे. माशांनी भरलेलं तलाव आणि हिरवळीची मखमल असलेला बगीचा इथे आहे. विनायकाचे मंदिर आणि रत्नागिरीतील निसर्गरम्य परिसरात ओम आणि स्विटूचा विवाह ही दृश्य नक्कीच प्रेक्षकांना सुखावणारी असणार आहेत. मालिकेचे काही भाग देखील येथील आसपासच्या परिसरात शूट करण्यात आले आहेत. ओमच्या घरातील मंडळी देखील खूप खुश आहेत आणि आता ते देखील त्याला स्विटूला प्रपोज करण्यासाठी पाठिंबा देत आहेत. आता मालिकेत तुम्हाला हे मंदिर आणि येथील आसपासचा परिसर देखील पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर रत्नागिरीला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या भव्य मंदिराला देखील नक्की भेट द्या.