
सोशल मीडियावर ट्रोल होणं हे आता नित्याचीच बाब झाली आहे. या कारणास्तव कित्येक मराठी कलाकारांनी काही काळासाठी सोशल मिडियापासून दूर राहणे पसंत केले होते. सुयश टिळक, केदार शिंदे, तेजश्री प्रधान यांनीही काही काळासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या ट्रोलला कंटाळून म्हणा किंवा एक ब्रेक म्हणून सोशल मीडियाला राम राम ठोकला होता. आताही येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मालविका म्हणजेच ही भूमिका साकारत असलेल्या आदिती सारंगधर हिनेही “Time to take a break from social media… bye for now”… असे म्हणत सोशल मिडियाला काही काळासाठी राम राम ठोकला आहे.

कुठल्याही कलाकारासाठी प्रसिद्धीचे माध्यम म्हणून किंवा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे मध्यम म्हणून इन्स्टाग्राम किंवा फेसबुककडे पाहिले जाते. त्यादृष्टीने सोशल मीडिया हेच एक माध्यम सध्या खूप जास्त प्रभावी ठरत आहे. परंतु या माध्यमातून बऱ्याचदा कलाकारांना ट्रोलही केले जाते. अशातच सततच्या ट्रोलिंगमुळे किंवा एक सोयीस्कर उपाय म्हणून या माध्यमांना काही काळ आपल्यापासून दूर ठेवणे तितकेच गरजेचे वाटते. हाच निर्णय घेऊन अभिनेत्री आदिती सारंगधर हिने काही दिवस तरी सोशल मिडियापासून दूर राहण्याचे ठरवले आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या झी वाहिनीच्या मालिकेतून आदिती मालविकाची भूमिका साकारत आहे. याअगोदर तिने अनेक चित्रपट मालिकेतून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. हम बने तुम बने ह्या मालिकेतूनही तिने सुरेख भूमिका साकारली होती. तर बहुतेकदा तिच्या वाट्याला विरोधीच भूमिका आलेल्या आहेत. तिने निभावलेल्या आजवरच्या तिच्या या सर्वच भूमिकाना प्रेक्षकांनीही तितकीच भरभरून दाद दिली होती. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत तिला पुन्हा एकदा मालविकाचे विरोधी पात्र मिळाले.

या पात्रामुळे आदीतीला प्रेक्षकांच्या रोषाला नेहमीच सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर होणारी सततची टीका असो वा त्यापासून काही काळासाठीची सुटका याच उद्देशाने तिने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या बातमीसोबतच तिच्याबाबत एक अफवा देखील पसरवली जात आहे की “मालविकाने मालिका सोडली… ” मुळात मालविकाच्या पात्रामुळेच ओम आणि स्वीटूच्या नात्यांत दुरावा निर्माण होत आहे त्यामुळे हे विरोधी पात्र मालिकेतून एक्झिट का घेईल याबाबत खात्री पटते. त्यामुळे आदिती सारंगधर मालिका सोडणार नाही तर ती फक्त सोशल मिडियापासून काही काळ लांब राहणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. या अफवा आणि सोशल मीडियाच्या त्रासापासून दूर राहता यावे म्हणून तिने घेतलेला हा निर्णय तिच्यासाठी आत्ता तरी योग्यच म्हणावा लागेल.