
येऊ कशी तशी मी नांदायला मालिका सुरुवातीला अगदी छान चालली होती आणि प्रेक्षकांच्या ती पसंतीस देखील उतरली होती. त्याच त्याच कथानकाला फाटा देऊन आणि एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न या मालिकेने केलेला पाहायला मिळाला. मात्र स्वीटू आणि ओमच्या लग्नात आलेला ट्विस्ट प्रेक्षकाना रुचलाच नाही. जिथे ओम आणि स्वीटूच्या लग्न सोहळ्याची प्रेक्षक वाट पाहत होते इथे नेमके मोहित आणि स्वीटूचे लग्न झाले हे पाहून प्रेक्षकांनी या मालिकेबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. गाडी रुळावरून कधी खाली घसरली याचे भानच मालिकेच्या लेखकाला राहिले नाही अशी टीका या मालिकेच्या चाहत्यांनी केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ह्या मालिकेवर टीका केली जात आहे.

इतके दिवस होऊनही ओमच्या बाबतीत स्वीटूचा झालेला गैरसमज अजूनही दूर झालेला नाही याचा अर्थ ही मालिका किती ताणणार आहेत आणि आणखी किती दिवस प्रेक्षकांच्या गळ्यात मारणार आहेत अशी विरोधी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर दिली जात आहे. मधल्या काळात हे दोघेही एकाच ऑफीसमध्ये काम करताना दिसले आणि तिथे अभिनेत्री प्रिया मराठेची नव्याने एन्ट्री केली. ओम आणि स्वीटूमध्ये झालेला दुरावा इथेतरी कमी होईल अशी चिन्ह दिसत होती मात्र इथेही प्रेक्षकांचा हिरमोड होत गेला. याउलट स्वीटूचा पती मोहित स्वीटूच्या ऑफिसमध्ये येऊन सर्वांसमोर गोंधळ घालतो तरीदेखील ओम आणि स्वीटू ह्यांच्या नात्यातील सत्यता कोणालाही ओळखता आली नाही. त्यामुळे प्रियाचे मालिकेत येणे सार्थकी ठरलेच नाही असेच चित्र निर्माण झाले. मालिकेत स्वीटूचे वडील म्हणजेच दादा साळवी आपले आयुष्य संपवावे म्हणून स्वीटूच्या लग्नात जीव द्यायला जातात. ही गोष्ट स्वीटूला समजते आणि हे सर्व ओममुळेच झालंय असा तिचा समज आहे याबाबत ती नुकतीच ओमला जाब विचारते…तुझ्यामुळे एक कुटुंब उध्वस्त झालं, माझं आयुष्य बरबाद झालं असं ती त्याला बोलते त्यावेळी कोणीच तिला खरं काय घडलं ते सांगून का नाही टाकत?…असा डोक्यात तिडीक जाणारा प्रश्न प्रेक्षकांच्या निर्माण झाला आहे.

स्वीटू ओमला एवढं सुनावते आणि तरीही सगळे गप्प का?…दादा साळवी, स्वीटूची आई एवढ्या दिवस स्वीटूला खरं का नाही सांगू शकले…की मालिका वाढवायची म्हणून ह्या विषयाला एवढे फाटे दिले जातात असाच विरोधी सूर आता या मालिकेबाबत तयार झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही मालिका संपवावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. इकडे ओमच्या आईला आणि रॉकीला सगळं सत्य समजूनही ते स्वीटूला सत्य सांगताना पाहायला मिळाले नाही. पण मालिकेच्या लेखनात उणीव असली तरी मालिकेतील कलाकार उत्तम अभिनय करतात या बाबत अजिबात शंका नाही मात्र कथानकात होणारी वाढ प्रेक्षकांचा निश्चितच अंत पाहणारी आहे. मालिकेच्या नुकत्याच आलेल्या पुढील भागाच्या प्रोमोवर देखील प्रेक्षकांच्या अशाच स्वरूपाच्या उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.