माझी तूझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेत लवकरच नेहा आणि यशचा लग्नसोहळा पार पडणार आहे. सिल्वासा सारख्या निसर्गाने नटलेल्या ठिकाणी हा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार असल्याने या सोहळ्याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सिल्वासा ही भारताच्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा आणि नगर हवेलीची राजधानी आहे. सिल्वासा निसर्गसौंदर्याने नटलेले एक पर्यटन स्थळ आहे. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणाच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक मुख्य आकर्षण ठरले आहे. गेल्या वर्षी सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने मालिकांच्या चित्रीकरणाला स्थगिती दिली होती.

त्यावेळी अनेक मालिकांनी मनोरंजन थांबू नये या हेतूने महाराष्ट्राबाहेर जाऊन मालिकांचे चित्रीकरण केले होते. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या कलाकारांनी देखील सिल्वासा येथे जाऊन हे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यावेळी या पर्यटन स्थळाची ओळख मराठी प्रेक्षकांना झाली होती. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि यशचे असेच एक डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून त्यांनी सिल्वासा ठिकाणाला पसंती दर्शवली आहे. मालिकेची टीम नुकतीच सिल्वासाला पोहोचली आहे आणि या लग्नाच्या सजावटीची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. नुकतेच नेहा आणि यशच्या मेहेंदी सोहळा आणि हळदीच्या सोहळ्याचे चित्रीकरण पार पडले आहे. नेहाने यशच्या नावाची मेहेंदी आपल्या हातावर सजवली आहे. तर कालच त्यांच्या हळदी सोहळ्याचे चित्रीकरण पार पडले आहे. सोहळ्यातील परी आणि नेहाचा लूक एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम आता लग्नाच्या इच्छित स्थळी म्हणजेच सिल्वासा येथे दाखल झाली आहे जिथे हे ग्रँड वेडिंगचे शूटिंग पार पडणार आहे.

तुला पाहते रे या मालिकेत देखील ईशा आणि विक्रांतचे ग्रँड वेडिंग पाहायला मिळाले होते. असाच घाट आता या मालिकेत देखील रंगवलेला पाहायला मिळणार आहे. ह्या आठवड्यात मालिकेमध्ये आजोबा नेहा आणि यशच्या लग्नाला परवानगी देताना दिसणार आहेत. त्यांचा यशवरचा राग आता दूर होत असल्याने ते नेहाला नातसून करायला तयार होणार आहेत. त्यासाठी आजोबा, यश, काका, काकू, समीर असे सगळेच जण नेहाच्या घरी जाऊन कांदेपोह्यांचा कार्यक्रम करणार आहेत. नेहाला नातसून म्हणून पसंती दिल्यानंतर मालिकेत नेहा आणि यशची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळणार आहे. नेहाच्या मेहेंदीचा आणि हळदीचा सोहळा तिच्याच घरी पार पडणार असल्याने यश तिथे येऊन काय काय धमाल करणार याची उत्सुकता आहे.