
झी मराठी वाहिनीने रविवारी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दोन तासांचा विशेष भाग आयोजित केला होता. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका ८ वाजता प्रक्षेपित करण्यात आली. या दोन तासांच्या विशेष भागात नेहा आणि यशच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. मालिकेच्या सुरुवातीला संगीत सोहळा रंगला त्यात बंडू काका काकुंचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला. विश्वतीज काका मिथिला काकू यांनी देखील एका रोमँटिक गाण्यावर नृत्य सादर केले. सिम्मी काकू काकांनी देखील नृत्यामध्ये धमाल उडवून दिली. संगीत सोहळ्यानंतर यश घोडीवर बसून लग्नमंडपात दाखल झाला. वरातीमध्ये या सर्व कलाकारांनी नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर सिम्मी काकूंनी परीला एकटीला पाहून नेहा आणि यशच्या विरोधात सांगण्यास सुरुवात केली.

यश आता तुझा फ्रेंड नाही तर बाबा होणार आहे त्यामुळे तो कधी तुला रागवेल , ओरडेल पण तू हे कोणाला सांगू नको असे म्हणून सिम्मी काकू परीला घाबरून सोडते. सिम्मीचे हे बोलणे ऐकून परी नेहा आणि यशचे लग्न थांबवते. हे लग्न होऊ नये म्हणून ती या निर्णयावर ठाम राहिलेली पहायला मिळाली. त्यामुळे नेहा आणि यश परीची समजूत घालायला तिच्याकडे येतात. अशातच मालिकेत धक्कादायक वळण येत एका अनोळख्या व्यक्तीची एन्ट्री होते. हा व्यक्ती रिपोर्टर बनून यश नेहाच्या लग्नात प्रवेश करतो. इथे तो गिफ्ट बॉक्समध्ये नेहासोबत असलेला एक फोटो ठेवतो आणि अविकडून सप्रेम भेट…असा शुभेच्छाचा मेसेज लिहितो. मालिकेतला हा ट्विस्ट रंगतदार होत असतानाच गेल्या अर्ध्या तासापासून मालिका भरकटलेली पाहायला मिळत आहे. दोन तासांच्या विशेष भागात मालिकेच्या ऐवजी प्रेक्षकांना जाहिरातींचा सपाटा पाहायला मिळत आहे. मालिकेतला हा सावळा गोंधळ आता प्रेक्षकांचा अंत पाहत आहे की काय असेच चिन्ह आता दिसू लागले आहे. मालिकेत ट्विस्ट येण्याअगोदरच जाहिरातींचा आणि नव्या मालिकेच्या प्रोमोचा सपाटा प्रेक्षकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. त्यामुळे दोन तासांच्या विशेष भागात हा सावळा गोंधळ नाहक त्रासदायक ठरू लागला आहे. ह्या गोष्टी लक्षात येताच तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळानंतर अखेर मालिकेचा ट्रॅक पुन्हा रुळावर आलेला पाहायला मिळाला. त्यानंतर यश आणि नेहा परीची समजूत घालण्यासाठी तिच्याकडे गेलेले पाहायला मिळाले.

अर्थात या नंतर मालिका मूळ ट्रॅकवर आलेली पाहायला मिळाली मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या मालिकेत आणखी काही मिनिटांचा मोठा ब्रेक लागला. दोन तासांची ही मालिका रात्री १० वाजता संपणे अपेक्षित होते मात्र या वाढीव ब्रेकमुळे ही मालिका आणखी एक तास लांबलेली पाहायला मिळाली. त्यानंतर भरकटलेला हा ट्रॅक पुन्हा मूळ पदावर आल्यानंतर प्रेक्षकांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकला. परंतु मालिकेत दोन्ही वेळेस हे व्यत्यय नेमके कशासाठी? हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना सतावणारा ठरला आहे. अर्थात यानंतर तांत्रिक कारणास्तव हे व्यत्यय आले असल्याचे मालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करत आज १३ जून रोजी सकाळी १० वाजता आणि दुपारी ४ वाजता पुन्हा एकदा दोन तासांचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर याच सावळ्या गोंधळाची सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.