दाक्षिणात्य चित्रपटाला हिंदी मध्ये डब करण्यासाठी मराठी कलाकारांचीच निवड केली जाते हे आता सर्वश्रुत झाले आहे. बाहुबली चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी शरद केळकरने आणि पुष्पा चित्रपटासाठी श्रेयस तळपदेने आपल्या आवाजात डब केलं आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमवताना दिसले आहेत. नुकताच रिलीज झालेल्या KGF2 या चित्रपटाची देखील सगळीकडे चर्चा आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घालत ६४५ कोटींचा गल्ला जमवला . KGF2 चित्रपटातील डायलॉग देखील खूपच लोकप्रिय झालेले पाहायला मिळाले. ‘ट्रिगर पे हाथ रखने वाला शूटर नहीं होता। लड़की पे हाथ डालने वाला मर्द नहीं होता और अपुन की औकात अपुन के चाहने वालों से ज्यादा और कोई समझ नहीं सकता।’ असे बोटावर मोजण्याइतके डायलॉग भारदस्त आवाजाने प्रेक्षकांना रोमांचित करून गेले. KGF2 चित्रपटासाठी ‘सचिन गोळे’ या मराठमोळ्या कलाकाराने यशला आवाज दिला आहे. सचिनची निवड देखील यशनेच केली आहे.

सचिन गोळे हा गेल्या १४ वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहे . मिळेल त्या छोट्या छोट्या भूमिकांना त्याने आपल्या आवाजात डब केलं आहे. मात्र KGF चित्रपटामुळे त्याला आता सगळीकडे ओळखले जात आहे याचे श्रेय तो आई वडील , देवाला आणि चित्रपटाच्या नायकाला देऊ इच्छित आहे. सचिन गोळे आपल्या आईवडिलांसोबत पनवेल येथे राहत होता. २००८ साली त्याला या क्षेत्राची ओढ लागली. वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने मुंबई गाठली. मात्र २०१० साली आईवडिलांचे छत्र हरवले. पुढे नोकरी करता करता वेगवेगळ्या स्टुडिओला भेटी दिल्या. त्यावेळी तू एक मराठी कलाकार आहेस आणि तुझे उच्चार स्पष्ट नाहीत असे म्हणून त्याला नकार देण्यात येत होते. याच प्रवासात त्याला मार्गदर्शन करणारी गणेश दिवेकर सारखी बरीचशी मित्रमंडळी भेटली. आवाजात सुधारणा होत गेली तस तशी छोट्या छोट्या भूमिकेसाठी विचारणा केली जाऊ लागली. ‘मेरी ताकद मेरा फैसला’ या चित्रपटासाठी पहिला मोठा ब्रेक मिळाला. हा एक साउथचा चित्रपट होता ज्यात धनुष मुख्य भूमिकेत होता. प्रथमच मुख्य नायकाच्या डबिंगसाठी वर्णी लागल्याने सचिन खुपच खुश होता. त्यानंतर धनुषसाठी हिंदी चित्रपटाला सचिनच्याच नावाची विचारणा होऊ लागली. ‘मारी’ हा दाक्षिणात्य चित्रपट ‘राउडी हिरो’ या नावाने हिंदीमध्ये डब केला. त्यातील धनुषच्या मवाली भूमिकेला मी मुंबई स्टाईलने टच देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याची ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती.

मला सर्वांचे फोन आणि मेसेजेस येऊ लागले. माझं खूप कौतुक होऊ लागलं होतं. त्यानंतर वेबसिरीज, कार्टून कॅरॅक्टरसाठी विचारणा होऊ लागली. KGF च्या पहिल्या सिजनला यशच्या भूमिकेला डब केलं. त्यानंतर दुसऱ्या सिजनसाठी अनेकांनी ऑडिशन दिली मात्र यशने माझीच निवड केली. माझा आवाज त्याला ओरिजनल वाटला. यश जसा रिअल लाईफमध्ये नैसर्गिक आहे तसेच त्याने आपल्या आवाजात देखील नैसर्गिकपणा जपला होता. तो प्रत्यक्षात स्टुडिओत येऊन बारकावे लक्षात घेत होता आणि माझं कौतुकही करत होता असे सचिन म्हणतो. KGF 2 चित्रपट आता खूपच लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाला मिळालेले यश पाहून माझे मित्र नातेवाईक मला आदराने बोलवतात माझ्याशी गप्पा मारतात. मला सन्मान देतात हे माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे. मला एवढा मानसन्मान मिळाला तो केवळ देवाचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद आणि यश सरांच्या प्रोत्साहनामुळे. ही माझी १४ वर्षांची मेहनत आहे आणि आज याचे फळ मला मिळत आहे. जीवन जगायला पैसा लागतो पण हा मानसन्मान देखील तितकाच महत्वाचा आहे आज मला एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली आहे तीच माझ्यासाठी मोलाची आहे असे सचिन म्हणतो.