माझा होशील ना या मालिकेतून विराजस कुलकर्णीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत त्याने आदित्यची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर विराजस आता दिग्दर्शन क्षेत्राकडे वळला आहे. व्हीकटोरिया या आगामी चित्रपटात तो दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर विराजसच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. विराजस कुलकर्णी आणि त्याची खास मैत्रीण आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ७ मे रोजी विवाहबद्ध होत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांनी एंगेजमेंट झाली असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हे दोघेही लवकरच लग्न करणार असे मृणाल कुलकर्णी यांनी सूचित केले होते.

काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली होती. ७ मे रोजी होणाऱ्या त्यांच्या लग्नसोहळ्याला विराजसच्या आणि शिवानीच्या आईवडिलांनी कलाकारांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. काल १ मे रोजी या दोघांचा मेहेंदीचा सोहळा साजरा करण्यात आला. मेहेंदी सोहळ्याचे काही खास क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आले होते. हे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर करून लग्नाची लगबग सुरू झाल्याचे सूचित केले. शिवानीने तिच्या डाव्या हाताच्या बोटावर विराजसचे नाव मेहेंदीने ‘VIRYA’ असे काढलेले पाहायला मिळाले तर विराजसने देखील आपल्या हाताच्या मनगटावर ‘SHIVANI’ असे मेहेंदीने लिहून सजवलेले आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता लग्न ठरलं म्हटलं की कपल्स प्री वेडिंग शूट मध्ये ही दंग होतात पण इथे मात्र विराजस आणि शिवानी ऐवजी होणाऱ्या सासू-सुनेची म्हणजेच मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे फोटोसेशन जोरदार व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते. सून माझी लाडाची असं म्हणत या दोघींनी एक झक्कास फोटोसेशन केले होते.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचं लग्न ठरल्याची बातमी जानेवारीमध्ये त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. गोव्यातील एका क्रूझ वर रम्य सायंकाळी शिवानीच्या बोटात अंगठी घालून विराजसने तिला प्रपोज केलं होतं. या दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले होते. दोघे अनेकदा एकत्र पाहायला मिळाले होते पण त्यांनी कधीही एकमेकांसोबतच्या नात्याची कबुली जाहीरपणे दिली नव्हती. अगदी मृणाल कुलकर्णी यांना देखील त्यांच्या नात्याबद्दल लवकर समजले नव्हते हे त्यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर बोलून दाखवले होते. मृणाल कुलकर्णी आणि विराजस या मायलेकाचं नातं जितकं खास आहे तितकंच ते शिवानी सोबत देखील असेल असे त्यांनी म्हटले होते. आता त्या आपल्या होणाऱ्या सुनेच्या आगमनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांच्याइतकीच या लग्नाची उत्सुकता प्रेक्षकांच्या देखील मनात निर्माण झाली आहे.