मराठी इंडस्ट्री एवढी मोठी असूनही कलाकारांच्या अंत्य यात्रेत मात्र.. विजय कदम यांच्या अंत्यसंस्काराला मोजकेच कलाकार उपस्थित
आज १० ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दुःखद निधन झाले. गेल्या एक ते दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. पण या आजाराशी त्यांची ही एकाकी झुंज आज अखेर अपयशी ठरली. आज त्यांच्या निधनाची बातमी कळताच मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळाली. पण त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोजक्याच कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. दुपारपर्यंत मुंबईत विजय कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी अजिंक्य देव, जयवंत वाडकर असे मोजकेच सेलिब्रिटी हजर राहिले होते. दरम्यान विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. पद्मश्री जोशी यांची बहीण अभिनेत्री पल्लवी जोशी आणि निर्माते विवेक अग्निहोत्री हेही अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहिले होते. पण यामुळे मराठी इंडस्ट्री एवढी मोठी असूनही कलाकारांना विजय कदम यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही म्हणून खेद व्यक्त करण्यात येत आहे. या सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी माणुसकी मात्र दूर चाललेली पाहायला मिळत आहे.
कधी एकेकाळी कलाकारांच्या निधनाची बातमी ऐकून जनसागर जमा व्हायचा पण या आधुनिकीकरणामुळे माणुसकी कुठेतरी हरवत चालली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. अर्थात हे सगळं युग धावपळीचं आहे. प्रत्येकजण पुढे जाण्यासाठी मार्ग शोधत आहे, पण याच प्रवासात मागे राहिलेल्यांनाही एक धागा जोडून ठेवलेला असावा हीच एक अपेक्षा.