बहुप्रतिक्षित झुंड हा चित्रपट ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चित्रपट गृहात प्रेक्षकांची गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एक कोटींची कमाई केलेली दिसून आली. चित्रपट पाहून अनेक बॉलिवूड दिग्दर्शक तसेच अभिनेतत्यांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. तर काहींनी हा चित्रपट ऑस्करसाठी जावा असेही सुचवले आहे हेच या चित्रपटाचे खरे यश म्हणावे लागेल. मात्र हा चित्रपट प्रत्यक्षात घडलेल्या घटनेवर आधारित असल्याचे समोर आले आहे.

झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ज्या फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे त्या प्रशिक्षकाचे नाव आहे ” विजय बारसे”. विजय बारसे हे नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. गुन्हेगारी, चोरी, गुंडगिरी, गांजा विक्री अशा प्रवृत्तीच्या आहारी गेलेल्या मुलांना त्यांनी एकत्रित आणून खेळात गुंतवून ठेवण्याचे ठरवले. खेळात गुंतवून राहिल्यामुळे ही मुलं वाईट मार्गाला लागणार नाहीत असा विश्वास त्यांना वाटू लागला होता. याच विचाराने त्यांनी अशा झोपडपट्टी तसेच फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना एकत्र आणले आणि त्यांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले. मुलांचे खेळण्यातले आकर्षण पाहून अनेक मुले त्यांच्या कडे आकर्षित झाली. पुढे स्लम सॉकर लीग या स्पर्धा त्यांनी सुरू केल्या. त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळू लागल्याने ह्या स्पर्धा राज्य तसेच जिल्हा पातळीवर खेळण्यात येऊ लागल्या. सुरुवातीला ह्या क्षेत्रात कोणीही प्रायोजक मिळत नसल्याने निधी उपलब्ध होत नव्हता याच अनुषंगाने विजय बारसे यांनी स्वतःजवळचे पैसे खर्च केले. विजय बारसे यांची दखल अनेक वृत्त माध्यमांनी घेण्यास सुरुवात केली.

ही बातमी त्यांच्या अमेरिकेतील मुलाला समजली त्यावेळी तो देखील वडिलांच्या मदतीसाठी मायदेशी परत आला. अभिनेता आमिर खान यांचा सत्यमेव जयते हा शो अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे. याच शोमध्ये विजय बारसे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती. त्यावेळी आपण या क्षेत्रात कसे आलो याचा किस्सा त्यांनी आमिर खानला ऐकवला होता. आणि वाईट प्रवृत्तीत गेलेल्या मुलांना मूळ प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केल्याने या शोमध्ये त्यांचे कौतुक करण्यात आले होते. त्यांनी नागपूर येथे क्रीडा विकास संस्था उभारली आहे ज्यातून अशा मुलांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. या कार्यात त्यांना त्यांची पत्नी रंजना बारसे आणि मुलगा अभिजित बारसे यांचीही भक्कम साथ मिळताना दिसत आहे. विजय बारसे यांच्या जीवनाचा यशस्वी प्रवास नागराज मंजुळे यांनी आपल्या झुंड चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.