
क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया या शोमधून अनेकांना सतर्क राहण्याचे सल्ले दिले जातात मात्र याच मालिकेतील दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली नुकतीच अटक करण्यात आली आहे. या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने आणि शूटिंग बंद असल्याने गोरेगाव येथील त्यांच्या जवळच्या मित्राच्या आरे कॉलनीतील रॉयल पॉम या पॉश सोसायटीत १८ मे रोजी पेइंग गेस्ट म्हणून भाड्याने राहत होत्या. याच रूममध्ये अगोदरच एक पार्टनर राहत असल्याचे सांगण्यात येते. जिच्या लॉकरमध्ये असलेले ३ लाख २८ हजार रुपये या दोघींनी चोरले आणि तिथून पळ काढला. संशय येताच त्या पार्टनरने या दोन्ही अभिनेत्रींविरोधात पोलिसस्टेशन मध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदवली.

पोलिसांनी या दोघीना चौकशीसाठी अटक केली होती. सुरुवातीला चौकशी दरम्यान या दोघीही काहीच सांगायला तयार नव्हत्या मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दोघींचे कटकारस्थान उघड झाले तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. हाताला काम नसल्याने आणि शूटिंग बंद असल्याने आम्ही ही चोरी केली असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. येत्या २३ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवणार असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही अभिनेत्रींची नावे “सुरभी सुरेंद्रलाल श्रीवास्तव” आणि “मोहसीना मुख्तार शेख” अशी असून या दोघींचे अनुक्रमे वय २५ आणि १९ असल्याचे सांगण्यात येत आहे. सावधान इंडिया , क्राईम पेट्रोल याप्रमाणेच काही वेबसीरिजमध्येही यांनी काम केले होते. मात्र बरेच दिवस झाले शूटिंग बंद असल्याने पैशांचा प्रश्न या दोघींपुढे उपस्थित राहिला होता. मुंबईत आरे कॉलनीत त्यांचा एक मित्र रॉयल पॉम नावाची एक पॉश सोसायटी आहे तिथे पेइंग गेस्ट म्हणून आपल्या रुम तो भाड्याने देत होता. याचाच फायदा घेण्याचे या दोघींनी ठरवले. पॉश सोसायटी असल्याने तेथे येणारे पेइंग गेस्ट हे देखील धनाढ्य असणार याची खात्री त्यांना होती. याच अनुषंगाने त्यांनी हा बनाव रचण्याचे ठरवले. मात्र लोकांना जागरूक करता करता आपणच या कचाट्यात कसे अडकलो हे न उमगणारे कोडे. तुर्तास या दोघींच्याजवळील ५० हजारांची रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील काही दिवसांच्या चौकशीपर्यन्त त्यांना पोलीस कोठडीतच ठेवणार आहे असे सांगण्यात येते.