भूत आहे की नाही हा वेगळा विषय आहे. एखादय़ा ठिकाणी भूत आहे असं म्हणणारेही आहेत आणि जगात भूत बित काही नसतं हे छातीठोकपणे सांगणारेही आहेत. सिनेमा, मालिका या क्षेत्रात तर भूत हा विषय ऑल टाइम हिट असतो. हॉरर स्टोरीलाइनवर पडदय़ावर आलेल्या सिनेमांनी एक काळ गाजवला आहेच पण सध्याही भूत या संकल्पनेवर बेतलेल्या गोष्टी सिनेमा, मालिकांमधून दाखवण्यासाठी अनेकजण तयार आहेत. बर या झाल्या पडदयावरच्या भुताच्या गोष्टी. पण खरोखर जर कुणी भुताचा भास झाल्याचा अनुभव सांगितला तर घाम फुटतोच.

अभिनेता विराजस कुलकर्णी याला पुण्यातील एका रस्त्यावर भर मध्यरात्री भूत दिसले आणि त्याची बोबडीच वळली. हा अनुभव विराजसने त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केला आहे. विराजसने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो असं सांगत आहे की, नाटकाचे काम आटपून मी आणि माझा मित्र बाइकवरून घरी चाललो होतो. मित्र बाइक चालवत होता आणि मी मागे बसलो होतो. पुण्यातील एका रस्त्यावरून जात असताना मला बाइकच्या वाटेत एक माणूस आल्याचा भास झाला. धोतर, पांढरा शर्ट, पांढरी गांधी टोपी अशा वेशभूषेतील ती व्यक्ती बाइक समोर आल्याचा भास झाल्याने मी चमकलो. पण ती व्यक्ती काही क्षणात दिसेनाशी झाली. तोपर्यंत मित्राने बाइकचा ब्रेक करकचून दाबला. मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगावी की नको या विचारात असतानाच मित्राने म्हटलेल्या सॉरी या शब्दाने भानावर आलो. मला तो मित्र म्हणाला, की सॉरी रे असा ब्रेक लावल्याबददल.. पण मला एक पांढरे धोतर, शर्ट आणि टोपी घातलेले आजोबा बाइकसमोर आल्याचे दिसले. त्यामुळे मला अचानक ब्रेक लावावा लागला, पण ते कुठे गायब झाले हे कळलेच नाही. आता हा भास असेल की खरच कुणी व्यक्ती आली आणि गेली ते कळलेच नाही.

मित्राचे ते बोलणे ऐकून मी चांगलाच घामेघूम झालो. इथे कुठेही न थांबता गाडी चालव असं मित्राला म्हणत आम्ही आपापल्या घरी पोहोचलो. विराजसच्या या पोस्टला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. डावीकडून चौथी बिल्डिंग या नाटकाच्या लेखनदिग्दर्शनापासून ते अनेक प्रायोगिक व व्यावसायिक नाटकात त्याने काम केले आहे. माझा होशील का या मालिकेतून त्याने टीव्हीइंडस्ट्रीत पदार्पण केले. अभिनेत्री शिवानी रांगाळेसोबत त्याचा साखरपुडा झाला असून लवकरच ही जोडी लग्न करणार आहे. विराजस नेहमीच सोशलमीडियावर अॅक्टीव्ह असतो. ऑफस्क्रिन धमालमस्तीसोबत विराजस त्याच्या जादूच्या पोस्ट करत असतो. त्याच्या जादूच्या प्रयोगांना कायमच दाद मिळते. मात्र भर मध्यरात्री त्याने अनुभवलेला प्रसंग हा कोणतीही जादू नसून भास होता की सत्य हे मात्र अजूनही विराजसला कळलेलं नाही.