झी मराठी वाहिनीवर तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रसारित होत होती. जवळपास पाच वर्षाहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते त्यामुळे मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहीले आहेत. मालिकेत सुरज आणि नंदिताचा मुलगा युवराज बहुतेकांना आठवत असेल. हा युवराज नंदिता सारखाच विरोधी भूमिकेत पाहायला मिळाला होता. राणाच्या मुलीला तो त्रास द्यायचा. या युवराजची भूमिका साकारली होती बालकलाकार “श्रेयस मोहिते ” याने.

श्रेयस मोहिते आता सन मराठी वाहिनीवरील “आभाळाची माया” या मालिकेत झळकताना दिसत आहे. या मालिकेत तो बंट्याची भूमिका निभावत आहे. आभाळाची माया या मालिकेत अशोक फळदेसाई आणि अपूर्वा सपकाळ मुख्य भूमिकेत दिसत आहेत तर छाया सांगावकर , स्वप्नील राजशेखर, विनिता काळे, दक्षता जोईल , पुष्कर सरद, संजय मोहिते यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. श्रेयस मोहिते कोल्हापूर येथील विद्यापीठ हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण घेत आहे तर फिनिक्स ऍक्टिंग स्कुलमधून अभिनयाचे धडे त्याने गिरवले आहेत. तुझ्यात जीव रंगला मालिकेत युवराजच्या भूमिकेसाठी त्याने ऑडिशन दिली होती. अनेक मुलांमधून श्रेयसची निवड करण्यात आली होती. ही त्याने अभिनित केलेली पहिली टीव्ही मालिका ठरली. या मालिकेनंतर श्रेयसने ‘हापूस’ या लघुपटात काम केले होते. कोकण आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात श्रेयसला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले होते. यानंतर तो आभाळाची माया या मालिकेत बंटीचे खट्याळ पात्र साकारताना दिसत आहे.

याच मालिकेत श्रेयसचे वडील म्हणजेच अभिनेते संजय मोहिते हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेमुळे खऱ्या आयुष्यातील बाप लेक एकत्रित प्रेक्षकांसमोर आले आहेत. संजय मोहिते यांनी अनेक नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून काम केले आहे. फॉरेनची पाटलीन, वन रूम किचन, ऑन ड्युटी २४ तास, हलगी, राजा राणी ची गं जोडी, मधू इथे अन चंद्र तिथे, वाजलाच पाहिजे, सोकाजीराव टांगमारे, सुखी माणसाचा सदरा या मालिका, चित्रपट तसेच नाटकांमधून संजय मोहिते झळकले आहेत. या काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. संजय मोहिते यांचे कोल्हापूर येथे फिनिक्स क्रिएशन्स या नावाने ऍक्टिंग स्कुल आहे. या संस्थेतून अनेक होतकरू कलाकार घडवले आहेत.