झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. सुरुवातीला मालिकेतील भली मोठी स्टार कास्ट पाहून कोणती भूमिका कोणता कलाकार साकारतोय हेच समजण्यासाठी खूप वेळ गेला असा नाराजीचा सूर प्रेक्षकांकडून पाहायला मिळाला होता. मात्र मालिकेतील एक एक पात्र पुढे येत राहिले तशी या मालिकेतली मजा अधिक वाढत गेली असेही या मालिकेबाबत म्हटले जात आहे. त्यामुळे आता ही मालिका हळूहळू का होईना प्रेक्षकांना आपल्या बाजूने खेचताना पाहायला मिळत आहे.

अर्थात या मालिकेच्या कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका अधिक खुलत गेली असे म्हणायला हरकत नाही. अमृता पवार आणि हार्दिक जोशी या मुख्य कलाकारांना मिळालेली सह कलाकारांची साथ देखील तितकीच मोलाची आहे. या मालिकेत नानी काकींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…मालिकेत विसरभोळ्या नानी काकींची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “पूनम चव्हाण देशमुख” यांनी. पूनम चव्हाण यांनी मुंबईतील एसएनडीटी युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. लग्नानंतर त्या नाशिकला आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाल्या . लहानपणापासूनच नाट्यछटा, एकांकिका तसेच नाट्यस्पर्धांमध्ये त्या सहभागी व्हायच्या. पुढे राज्यनाट्य स्पर्धांमध्ये त्यांच्या अभिनयाची सातत्याने दखल घेतली गेली यातूनच सलग तीन वर्षे त्यांनी उत्कृष्ट अभिनयाची प्रमाणपत्रे मिळवली. वंद्य वंदे मातरम या शॉर्टफिल्ममध्ये पूनम चव्हाण एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपला तग धरून ठेवला आहे.

अभिनया व्यतिरिक्त पूनम चव्हाण या व्यवसाय क्षेत्रात देखील उतरलेल्या पाहायला मीळतात. “स्वादम” या नावाने त्यांचा खाद्य पदार्थांचा व्यवसाय आहे. उन्हाळी वाळवणं तसेच गाईचं तूप, ढोकळा पीठ, केळी वेफर्स, दिवाळी फराळ, आवळा कँडी, सांबर मसाला असे पदार्थ त्यांच्या या व्यवसायात समाविष्ट केले आहेत. त्यांच्या या पदार्थांना भरपूर प्रमाणात मागणी देखील असते. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही पूनम चव्हाण यांनि अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका आहे. परंतु झी वाहिणीसारखा मोठा प्लॅटफॉर्म मिळणे हे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते असेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पूनम चव्हाण त्यांनी टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी मालिकेत साकारलेली नानी काकी प्रेक्षकांना देखील आवडू लागली आहे. मालिकेत साध्यासुध्या दुसणाऱ्या नानीकाकी मात्र खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहेत. मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!