झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहे. या मालिकेत नुकतेच रेवा दीक्षितचे पात्र देशमुखांच्या कुटुंबात दाखल झाले आहे. रेवाच्या येण्याने आदितीच्या सुखी संसारात आता कल्लोळ माजणार आहे. सिद्धार्थ आणि रेवा यांची जवळीक वाढणार असल्याची भीती आदीतीला सतावत आहे. मालिकेत रेवाची भूमिका विनी जगताप हिने निभावली आहे. रेवाची भूमिका मर्यादित असली तरी ह्या भूमिकेमुळे मालिकेला काय नवे वळण मिळणार याची उत्सुकता आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे.

याअगोदर मालिकेतील काही महत्वाची पात्र बदलण्यात आली होती परंतु असे असले तरी मालिकेत कुठलाही प्रकारे फारसा फरक जाणवून आला नाही. नायकाची आई म्हणजेच मोठीबाईंची भूमिका याअगोदर अंजली जोशी साकारत होत्या मात्र आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ नायकाचे वडिलांचे पात्र बदलण्यात आले. आता मालिकेतील पल्लवी देशमुख म्हणजेच पल्लू काकीची भूमिका साकारणाऱ्या रेखा कांबळे सागवेकर यांनी ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. हर हर महादेव या आगामी चित्रपटात रेखा सागवेकर हिला महत्वाची भूमिका मिळाली आहे. चित्रपटात काम करता यावे यासाठी तिने ही मालिका सोडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. कालच्या भागात पल्लु काकीच्या भूमिकेत दुसराच चेहरा पाहायला मिळाला. त्यामुळे रेखा सागवेकर यांनी मालिका सोडली असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या जागी आता अभिनेत्री ‘ज्योती राऊळ’ हिची पल्लु काकीच्या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे. ज्योती राऊळ हि चित्रपट नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या ज्योतीने सुलभा देशपांडे यांच्या दुर्गा झाली गौरी या बालनाट्यातून काम केले होते.

फुलवारी बच्चों की या मालिकेतून ज्योतीने बालकलाकार म्हणून हिंदी क्षेत्रात पदार्पण केले होते. अनाकलनीय या मराठी मालिकेतून तिचे मराठी सृष्टीत पाऊल पडले. वर्तुळ, भीती, ,गुज आम्ही कोण, अखेरचा सवाल, Tour Tour, ढ्यांन्टडॅण अशा मालिका,नाटक, वेबसिरीज मधून तिने अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अंतिम या बॉलिवूड चित्रपटात तिला झळकण्याची संधी मिळाली होती. सामाजिक भान जपलेल्या ज्योती राऊळ हिने २०१३ साली ‘समर क्रिएटिव्ह सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेची’ स्थापना केली. यातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. तिच्या या कार्याची दखल घेत रोटरी हिरकणी पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, कुलाबा गौरव पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत तिला पल्लवी काकीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. मालिकेला मोठी स्टार कास्ट लाभल्याने कुठल्या कलाकाराने मालिका सोडली तरी त्यात फारसा फरक जाणवून येत नाही असेच काहीसे या मालिकेच्याबाबत घडले आहे.