झी मराठी वाहिनीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक जोशी ला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. तर अमृता पवार हिने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून जिजाबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेत बरेचसे नवखे कलाकार झळकताना दिसत आहेत. एकत्र कुटुंब पद्धत कशी असते हे या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज या मालिकेतील कलाकारांची खरी नावं जाणून घेऊयात…

मालिकेतील देशमुख कुटुंबात एक बालकलाकार आहे त्याला ‘दुमन्या’ म्हणून सगळेजण हाक मारताना दिसतात. दुमन्या ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे “अर्जुन कुमठेकर”. अर्जुन कुमठेकर याची ही पहिलीच मालिका आहे. आई काकींची भूमिका अभिनेत्री “चित्रा कुलकर्णी” यांनी निभावली असून याअगोदर अनेक नाटक आणि मालिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. सुंदरा मनामध्ये भरली, प्रेमाच्या वाटेवर, अगं ऐकलस का? यातून त्यानी अभिनय साकारला आहे. “रेखा कांबळे” यांनी पल्लू काकींची भूमिका साकारली असून “सलमान तांबोळी” यांनी डॉक्टर काकांची भूमिका निभावली आहे. आपल्या पत्नीने खूप शिकावे अशी ह्या डॉक्टर काकांची ईच्छा असते मात्र पल्लू काकू केवळ पुस्तक समोर धरून अभ्यास करत असल्याचे भासवतात. “कोमल शेटे” या अभिनेत्रीने मालिकेतून अर्चना वहिनीची भूमिका साकारली आहे. कॉलेजमध्ये असताना कोमल शेटे हिने अनेक नाट्यस्पर्धेत सहभाग दर्शवला इथूनच तिच्या अभिनयाला खरा वाव मिळत गेला. अभिनेत्री “पूनम चव्हाण ” यांनी या मालिकेतून नानी काकीची भूमिका साकारली आहे.

तर “राधिका झणकार” हिने मोमो ची भूमिका निभावली आहे. “निवास मोरे” हे काकांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत तर या मालिकेतून आजोबांची म्हणजेच तात्यासाहेब देशमुखांची भूमिका “चारुदत्त कुलकर्णी ” यांनी साकारली आहे. चारुदत्त कुलकर्णी हे मूळचे नाशिकचे. ते मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअर असून अभिनयासोबतच ते उत्तम कवी ,लेखक आणि उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक नाटकातून काम केले आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात देखील आले आहे. अल्पावधीतच हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे, घरातील कुटुंबातील गोडवा आणि एकमेकांसोबत राहताना येणारी गम्मत पाहायला लोकांना नेहमी आवडते हे ह्यापूर्वी देखील अनेक मालिकांतून सिद्ध झाले आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या सर्व कलाकारांना त्यांच्या नव्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा….