‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जात आहे. या मालिकेचे आगळेवेगळे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. सावनीला शोधण्यासाठी तिची आई काय काय प्रयत्न करते हे मालिकेतून दर्शवले आहे. जुई भागवत हिने सावनीची भूमिका साकारली आहे तर तिच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम दिसत आहे. हरीश दुधाडे, सतीश पुळेकर, गौरी कुलकर्णी, विद्या करंजीकर या कलाकारांची देखील मालिकेत महत्वाची भूमिका आहे. मालिकेतील सावनी ही लक्षवेधी भूमिका साकारली आहे जुई भागवत हिने.

जुई भागवत हिने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. मकरंद देशपांडे या शोचे जज म्हणून काम सांभाळत होते. जुईला या शोमध्ये भावपूर्ण अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या जुईने झी मराठी वरील मालिकेतून बालकलाकाराची भूमिका साकारली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेतून जुई बालभूमिकेत पाहायला मिळाली होती. जुईने अनेक सांगीतिक कार्यक्रमातून गायन देखील केलं आहे. ही कला तिच्यात उपजत झाली ती तिच्या आई आणि वाडीलांमुळेच . जुईची आई दीप्ती भागवत या मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका आहेत तर तिचे वडील मकरंद भागवत हे संगीतकार आणि गायक म्हणून ओळखले जातात. दीप्ती भागवत यांनी अनेक मालिकेतून मुख्य तसेच सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. उंच माझा झोका, पिंजरा, स्वामिनी, मोगरा फुलला अशा अनेक चित्रपट आणि मालिकेतून त्या महत्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या आहेत.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून त्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसल्या आहेत. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या मालिकेचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत यांनी केले आहे. त्या उत्कृष्ट गायिका असून गीतकार म्हणूनही नावारूपाला येत आहेत. दीप्ती भागवत यांनी लिहिलेली काही गीतं मकरंद भागवत यांनी संगीतबद्ध केली आहेत. तू माझा सांगाती या मालिकेतील गीतं मकरंद भागवत यांनी संगीतबद्ध केली होती. आईच्या पावलावर पाऊल टाकत जुईने देखील अभिनय क्षेत्रात हळूहळू जम बसवण्यास सुरुवात केली आहे. तुमची मुलगी काय करते या मालिकेतून प्रथमच जुई प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. या भूमिकेसाठी जुई भागवत हिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…