झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका दाखल होत आहे. “तुला जपणार आहे” ही हॉरर मालिका झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रतीक्षा शिवणकर हिने याअगोदर अंतरपाट, जीवाची होतेय काहिली मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता झी मराठीवर पुन्हा एकदा ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सारं काही तिच्यासाठी मालिकेतील अभिनेता नीरज गोस्वामी हा देखील या मालिकेचा भाग असणार आहे. याच जोडीला मालिकेतून आणखी एक अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
ही अभिनेत्री जवळपास ८ वर्षाने झी मराठीवर परतणार आहे. ही अभिनेत्री म्हणजेच शर्वरी लोहकरे होय. शर्वरी लोहकरे हिने या सुखांनो या मालिकेतून झी मराठीवर पदार्पण केले होते. ऐश्वर्या नारकरची जाउबाई अशी तिची या मालिकेत भूमिका होती. त्यानंतर खुलता कळी खुलेना या मालिकेतही ती झळकलेली पाहायला मिळाली. शर्वरीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरूच आहे पण खुलता कळी खुलेना मालिकेनंतर ती जवळपास ८ वर्षाने झी मराठीवर परतणार आहे. त्यामुळे या नवीन मालिकेसाठी ती खूपच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे. झी मराठीचा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी अनेक कलाकार आजही धडपड करत असतात. कारण या वाहिनीवर कलाकारांना प्रेक्षकांच्या मनात स्वतःची ओळख बनवता येते. शर्वरी लोहकरे या अगोदर सोनी मराठीच्या निवेदिता माझी ताई मालिकेत विरोधी भूमिकेत पाहायला मिळाल्या.
त्यामुळे तुला जपणार आहे या मालिकेतही त्यांची भूमिका अशाच धाटणीची असणार का की सकारात्मक भूमिका असणार हे लवकरच स्पष्ट होईल. या मालिकेबाबत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मालिकेचे शीर्षक गीत संगीतकार कुणाल भगत याचे आहे. इन्फ्लुएझर अंकिता वालावलकर हिचा तो होणारा नवरा आहे. झी मराठीच्या लक्ष्मी निवास आणि तुला जपणार आहे या दोन्ही मालिकांचे शीर्षक गीताला त्याने संगीतबद्ध केलं आहे. तूर्तास या मालिकेशी निगडित असलेल्या सर्वच कलाकारांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!.