झी मराठी वाहिनीवर एकामागून एक नव्या मालिकांची रांग लागलेली पहायला मिळणार आहे. या नवीन मालिकांमुळे जुन्या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत मोठे बदल केले जात आहेत तर काही मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. नुकतेच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. तर २३ डिसेंबर पासून रात्री ८ ते ९ या १ तासात ‘ लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे. आजवर १ तासांचे रिऍलिटी शो पाहिले गेले मात्र ही मालिका चक्क १ तास पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. मालिका विश्वात ही बाब पहिल्यांदाच घडून येत असावी त्यामुळे १ तासाच्या भागाने प्रेक्षकांची निराशा होऊ नये अशीच अपेक्षा ठेवली जात आहे.
याच जोडीला आता झी मराठी आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांसमोर आणत आहे. “तुला जपणार आहे” ही एक हॉरर मालिका आहे. रात्रीस खेळ चाले या हॉरर मालिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे अशाच धाटणीची मालिका त्यांनी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तुला जपणार आहे या मालिकेची कथा आई आणि मुलीच्या नात्या भोवती जोडलेली आहे. या मालिकेला रात्रीचा स्लॉट देण्यात येईल असेही म्हंटले जात आहे. त्यामुळे ही मालिका शक्यतो रात्री १०.३० वाजता प्रसारित होईल असा अंदाज बांधला जात आहे. मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे. तुला जपणार आहे या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अंतरपाट, जीवाची होतीया काहिली, कॉलेज डायरी अशा माध्यमातून प्रतिक्षा झळकली आहे. प्रतीक्षा मूळची गडचिरोलीची. तिचे आईवडील दोघेही शिक्षक. एका लग्नाची पुढची गोष्ट या प्रशांत दामले यांच्या नाटकातून तिला मालिका, चित्रपटात येण्याचा मार्ग सापडला. डॉ अभिषेक साळुंखे सोबत तिने चार वर्षांपूर्वी लग्न केले. लग्नानंतर इंडस्ट्रीत काम करण्यासाठी नवऱ्याची तिला भक्कम साथ मिळाली. मालिकेत सहाय्यक ते मुख्य भूमिका साकारण्याचा तिचा हा प्रवास नक्कीच उल्लेखनीय म्हणावा लागेल. आता तर झी मराठी सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म तिला मिळाला आहे. त्यामुळे तिच्या या भूमिकेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. दरम्यान या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसातच समोर येईल.