
झी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेत्री “दीप्ती सोनवणे” हिने नुकतेच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तिने चंदाची भूमिका साकारली होती. मालिकेत नंदिता गायकवाड अर्थात वहिणीसाहेबांची ती पाठराखीण बनून गायकवाड कुटुंबात दाखल झाली होती. वहिनीसाहेब आणि चंदा राणा आणि अंजलीला त्रास देताना दिसले होते. त्यामुळे मालिकेतील या दोन्ही खलनायिका चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या. चंदा म्हणजेच दीप्ती सोनवणे हिने चला हवा येऊ द्या च्या शेलेब्रिटी पॅटर्न या मंचावरून प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. मालिकेत येण्याअगोदर दीप्ती ही नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती.

अभिनय आणि नृत्याचे धडे तिने अगोदरच गिरवले असल्याने आता अभिनया सोबतच ती डान्सची आवड तिच्या नव्या व्यवसायातून जोपासताना दिसणार आहे. दीप्तीने पुण्यातील पाषाण परिसरात स्वतःच्या नावाने “दिप्स अॅक्टिंग अँड डान्स अकॅडमी” सुरू केली आहे. या अकॅडमीतून विद्यार्थ्यांना नृत्याचे तसेच अभिनयाचे धडे दिले जाणार आहेत. सोबतच या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना नाटकातून काम करण्याची नामी संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभिनयाचे नऊ रस, वाचिक अभिनय , मुकाभिनय या सर्वांचे बारकावे शिकवले जाणार आहेत. तर नृत्यामध्ये बॉलिवूड, साल्सा, झुंबा हे डान्स फॉर्म तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. दीप्ती सोनवणे ही पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर अभिजित सोनवणे यांची सख्खी बहीण आहे. पुण्यातील रस्त्यावर, मंदिराजवळ बेवारसपणे जी लोकं बसलेली असतात त्यांच्यावर हे डॉक्टर मोफत उपचार करताना दिसतात. त्यामुळे पुण्यातील भिकाऱ्यांचे डॉक्टर अशीही ओळख त्यांना मिळाली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल अनेक वृत्त माध्यमांनी देखील घेतलेली आहे.