मराठी सृष्टीत सध्या लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. लवकरच तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि अंजलीबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर विवाहबंधनात अडकणार आहेत. काही महिन्यापूर्वीच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी पुण्यातील कर्वे नगर येथील पंडित फार्म्समध्ये लग्न केले होते याच ठिकाणी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लग्न करणार असल्याचे सांगितले जाते. या दोघांच्या अगोदर हार्दिक जोशीची नायिका म्हणजेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील अमृता पवार विवाहबद्ध होत आहे.

‘Bride to be’ असे म्हणत अमृताने आपल्या लवकरच होणाऱ्या लग्नसोहळ्याची बातमी जाहीर केली आहे. त्यामुळे अमृताच्या घरी आता तिच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. ३ एप्रिल २०२२ रोजी अमृता पवार आणि निल पाटील यांचा साखरपुडा पार पडला होता. ‘My person, for life’ असे म्हणत तिने या सोहळ्याचे खास फोटो इन्स्टग्राम अकाउंटवरून शेअर केले होते. अमृताने ज्याच्याशी साखरपुडा केला तो निल पाटील बायोमेडिकल इंजिनिअर आहे. अमृता ही मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून ती मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. हार्दिक जोशी आणि अमृताची केमिस्ट्री या मालिकेतून छान जुळून आली आहे. दुहेरी या मालिकेतून अमृताने प्रथमच छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात तिने नेहाची भूमिका साकारली होती. ललित २०५ या मालिकेत अमृताने भैरवीचे पात्र साकारले होते. सीनीअर सिटीझन हा तिने अभिनित केलेला पहिला चित्रपट. छोट्या छोट्या भूमिकेतून दिसणाऱ्या अमृताला, स्वराज्यजननी जिजामाता, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील आदीतीसमोर मोठमोठाली आव्हानं उभी आहेत. आपल्या आई वडिलांच्या कटकारस्थानाचा बळी ठरलेल्या आदीतीला नवऱ्याची देखील साथ मिळाली नव्हती. मात्र यातूनही सकारात्मक विचार ठेवून आदिती यशाच्या मार्गाकडे झेप घेताना दिसत आहे. या मालिके अगोदर अमृताने स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारली होती. मालिका लीप घेत असल्या कारणाने अमृताने साकारलेल्या जिजाऊंचे पात्र भार्गवी चिरमुले हिच्याकडे सुपूर्त करण्यात आले होते. पुढे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला. लग्नसोहळ्याच्या करणास्तव अमृता मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. त्यामुळे ती काही दिवस तरी या मालिकेचा भाग नसणार आहे.