मराठी सृष्टीत काही प्रसिद्ध कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. लवकरच मालिका सृष्टीतलं लोकप्रिय कपल राणा आणि अंजली म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे. अक्षया देवधरने लग्नाचे वेध लागले असतानाच होणारा नवरा म्हणजेच हार्दिकसाठी एक खास उखाणा घेतला होता. तिच्या या हटके उखाण्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळाल्या. या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून येत्या काही दिवसातच हे दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. त्याअगोदर हार्दिक जोशीची नायिका म्हणजेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार हिच्या घरी लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे.

अमृता पवार ने दोन दिवसांपूर्वीच होणारा नवरा निल पाटीलच्या नावाची मेहेंदी हातावर सजवली आहे. तर काल त्यांच्या हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. अमृताच्या हळदीचा लूक नुकताच समोर आला आहे. पिवळ्या आणि लाल रंगाच्या साडीत अमृताचा लूक अधिकच खुललेला पाहायला मिळाला. काल त्यांच्या हळदीचा समारंभ मोठ्या थाटात पार पडला असून आज संगीत सोहळा रंगणार असल्याचे सांगितले जाते. हळदीच्या सोहळ्याला अमृताच्या जवळच्या काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. उद्या बुधवारी ६ जुलै २०२२ रोजी अमृता पवार आणि निल पाटील विवाहबद्ध होत आहेत. लग्नाची तारीख तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पाहायला मिळाली. लग्नसोहळ्यासाठी अमृताने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. तिच्या लग्नाला मालिकेतील सहकलाकार मंडळी देखील आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. ३ मे रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या साखरपुड्याला अमृताने हजेरी लावली होती त्यामुळे तिच्या लग्नाला हार्दिक आणि अक्षया आवर्जून हजेरी लावणार असल्याचे बोलले जाते.

अमृताने आजवर अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून तिला जिजाऊंची भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली होती. खरं तर ही भूमिका वाट्याला येणं तिच्यासाठी भाग्याचं ठरलं. या मालिकेनंतर अमृता झी मराठीच्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. तिने साकारलेली आदिती प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेतून ब्रेक घेऊन ती आता स्वतःच्या लग्नाच्या लगबगीत आहे. पण लग्नानंतर पुन्हा ती मालिकेत नक्कीच पाहायला मिळेल. प्रमुख अभिनेत्री अमृता आणि त्याच मालिकेतील प्रमुख अभिनेता हार्दिक जोशी दोघांचं हि लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे मालिकेचे नवीन भाग करणे थोडं अवघडच जाणार असल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे. असो अभिनेत्री अमृता पवार आणि निल पाटील यांना आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!.