अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेच्या यादीत आता झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने आता स्थान मिळवलेले दिसत आहे. मालिकेचे यश हे त्याचे कथानक आणि त्यातील कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यावर अवलंबून असते. त्यामुळे यश, नेहा, समीर, आजोबा, परी, शेफाली, बंडू काका, काकू, मीनाक्षी ही सर्वच पात्र प्रेक्षकांना खूपच भावली आहेत. श्रेयस तळपदे या मालिकेतून १७ वर्षानंतर आणि प्रार्थना बेहरे तब्बल१० वर्षानंतर छोट्या पडद्याकडे वळले आहेत. मालिकेत काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री “मानसी मागिकर” या देखील बऱ्याच कालावधीनंतर मालिकेकडे वळलेल्या पाहायला मिळतात.

झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमध्ये त्यांनी अभिनय साकारलेला पाहायला मिळाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर त्यांचे पुनरागमन झाले आहे. मानसी मागिकर या नाट्य, चित्रपट आणि मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ९० च्या दशकातील ‘गोट्या’ या गाजलेल्या मालिकेतून त्यांनी माईंची भूमिका निभावली होती. आईचे छत्र हरवलेल्या गोट्यावर प्रेम करणारी माई मानसी मागिकर यांनी त्यांच्या अभिनयाने चोख बजावली होती. मानसी मागिकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव “विनया तांबे” असे होते. शाळेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात देखील त्या नेहमी सहभागी व्हायच्या. लहानपणापासूनच त्या सर्वांच्या आवडीच्या होत्या. पुढे कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक, आणि विविध नाट्य स्पर्धांमधून त्यांनी सहभाग दर्शवला होता. संगीताचे शिक्षण घेतलेल्या मानसी ताईंनी अनेक संगीत नाटकातून काम केले होते. विजय मागिकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या ‘मानसी मागिकर’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

विजय मागिकर यांनी राजदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’ या गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘गोट्या’ या मालिकेचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम सांभाळले होते. विनोदी लेखक चि. वि. जोशी यांच्या गोष्टींवर आधारित “चिमणराव आणि गुंड्याभाऊ” या मालिकेत कावेरी- काऊचे पात्र मानसी मागिकर यांनी साकारले होते. त्यांच्या या भूमिकेचे देखील खूप कौतुक झाले होते. ‘गोट्या’, ‘का रे दुरावा ‘, ‘अवघाची हा संसार’, ‘पुढचं पाऊल’, ‘हुप्पा हुय्या’, ‘लग्न पाहावे करून, ‘हापूस’ या आणि अशा अनेक चित्रपट मालिकेतून त्यांनी सोज्वळ भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात. घरकुल ही वेबसिरीज त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ह्या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्या काकूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तब्बल ५ वर्षानंतर त्यांचे छोट्या पडद्यावर झालेले पुनरागमन त्यांच्या चाहत्यांना मनोमन सुखावून गेले आहे…